वसतिगृहाला कुलूप लावून विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 10:46 PM2019-03-07T22:46:15+5:302019-03-07T22:46:38+5:30

शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध योजनांची अमलबजावणी केली जात नाही. प्रकल्प कार्यालयातील यंत्रणा केवळ आश्वासन देते, पण काम करीत नाही. याविरुद्ध आवाज उठवित गुरुवारी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला.

Students movement by locking the hostel | वसतिगृहाला कुलूप लावून विद्यार्थ्यांचे आंदोलन

वसतिगृहाला कुलूप लावून विद्यार्थ्यांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देचार वसतिगृहांतील विद्यार्थ्यांचा एल्गार : प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध योजनांची अमलबजावणी केली जात नाही. प्रकल्प कार्यालयातील यंत्रणा केवळ आश्वासन देते, पण काम करीत नाही. याविरुद्ध आवाज उठवित गुरुवारी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. शासकीय वसतिगृहाला कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले.
यवतमाळ शहरातील शासकीय वसतिगृह क्रमांक ३ (रुपनर) येथे सकाळीच सर्व विद्यार्थ्यांनी एकवटून प्रकल्प कार्यालयाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलनात वडगाव, रंभाजीनगर, तसेच उमरसरातील शासकीय वसतिगृह क्रमांक एक आणि दोन अशा चार वसतिगृहातील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी सामील झाले होते.
शैक्षणिक सत्र संपत आले तरी वसतिगृहांमध्ये संगणक मिळालेले नाहीत. वसतिगृहांची कायमस्वरुपी इमारत बांधण्याची तसेच वॉटर कुलर देण्याची मागणी प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतरही टायपिंग आणि एमएससीआयटीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी वंचित आहेत. वसतिगृहांमध्ये वाचनालय आणि स्पर्धा परीक्षेची दर्जेदार पुस्तके अजूनही पुरविण्यात आलेली नाहीत. या सर्वांचा रोष व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी वसतिगृहालाच कुलूप ठोकले.
२०१८-१९ या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्थगित आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने द्यावी आणि डीबीटीची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. शिवाय २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षातील पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निधी अजूनही बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पालकांच्या मोलमजुरीच्या पैशातून शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. या सर्व ढिसाळ कारभाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
आंदोलनात अक्षय उईके, मंगेश सिडाम, प्रफुल्ल किनाके, सुदर्शन मेश्राम, करण गेडाम, राकेश मरस्कोल्हे, प्रवीण येडमे, कपिल आत्राम, राहुल अंकुरे, मनीष कुडमथे, दत्ता कोवे, प्रसाद परचाके, हेमंत मिरासे, रोशन मरापे, निखिल कोवे, भीमराव टेकाम, गणेश आडे, देवानंद मडावी, अनिकेत कुडमेथे, आकाश मडावी, अजय बिलबिले, प्रणित मडावी, लखन मस्के, कुणाल तोडसाम, शुभम कुडमते, कुंदन मंगाम, दिनेश टेकाम, अमोल टेकाम, नितेश कोरचे, अशोक नैताम, मोरेश्वर गेडाम, शुभम पारधी, विनोद चिभडे आदी विद्यार्थी सहभागी झाले.

बारावीचे विद्यार्थी ग्रंथालयात
वसतिगृहाला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. यात अकरावी ते एमएपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मात्र बारावीची परीक्षा सुरू असल्याने सर्वसहमतीने त्यांना अभ्यासासाठी जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत पाठविल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर विद्यार्थी ठाम असून मागण्या पूर्ण न झाल्यास रात्रीही वसतिगृहाबाहेरच मुक्काम ठोकण्याचा इशारा दिला.

Web Title: Students movement by locking the hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.