दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:35+5:302021-09-21T04:47:35+5:30
विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशासाठी तसेच शैक्षणिक कार्याकरिता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र यांसारख्या दाखल्यांची आवश्यकता ...
विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशासाठी तसेच शैक्षणिक कार्याकरिता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र यांसारख्या दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, तहसील कार्यालयात हे दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रमाणपत्रावर नायब तहसीलदार डी. जी. रामटेके यांची डिजिटल सिग्नचेर आवश्यक आहे. परंतु रामटेके यांनी डिजिटल सिग्नचेर होत नसल्याने ९ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत जवळपास २०० ते ३०० विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. या दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तहसील प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी आहे. उत्पन्नाच्या दाखल्याकरिता सेतू सुविधा केंद्रांवर अर्ज करावा लागतो, तेथून ऑनलाईन दाखले तयार केले जातात. त्यावर नायब तहसीलदार रामटेके यांची डिजिटल सही केली जाते, त्याकरिता थंब लावावा लागतो. मात्र, सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे दाखले मिळत नाहीत. तांत्रिक अडचण दुरूस्त करून दाखले उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे. वास्तविक रामटेके यांची डिजिटल सहीची मुदत संपली आहे हे त्यांना व त्यांच्या कार्यालयाला माहितीच नाही. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून ते पालकांची दिशाभूल करत आहेत. याबाबत कार्यालयाला जाऊन चौकशी केली असता, तुमच्या घाईने होणार नाही, असे तेथील कर्मचाऱ्याने उत्तर दिले.
कोट : सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याने दाखले मिळण्यास अडचणीचे जात आहे. लवकरच दुरूस्ती होऊन दाखले मिळतील.
-डी. जी. रामटेके, नायब तहसीलदार, पांढरकवडा.