फुलसावंगीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषदेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 09:22 PM2019-08-02T21:22:53+5:302019-08-02T21:23:29+5:30
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासमोर ठिय्या दिला. दुपारी विद्यार्थी व पालकांनी वऱ्हांड्यातच भोजनही केले.
फुलसावंगी येथे जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शिक्षकांची एकूण १३ पदे मंजूर आहे. मात्र सध्या केवळ तीनच शिक्षक कार्यरत असून एकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे शिक्षकाची मागणी केली. शाळेला कुलूपही ठोकले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही.
शुक्रवारी एका ट्रॅव्हल्समधून पालक व शिक्षकांनी जिल्हा परिषद गाठली. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना घेराव घालून शिक्षकांची मागणी केली. त्यानंतर पालकांनी पदाधिकारी व सीईओंकडे धाव घेतली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पांढरे, संतोष बाजपेयी, दत्ता खंदारे, गणेश भगत, अमर दळवे, प्रशांत महाजन यांच्यासह महिला, पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनेक विद्यार्थी शिक्षकांअभावी शाळा सोडून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. संतप्त पालकांनी लेखी आश्वासन देईपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्वरित चार शिक्षक देण्याची ग्वाही दिल्याने पालकांनी आंदोलन मागे घेतले.
फुलसावंगी प्रमाणेच जिल्ह्यातील अनेक मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने वारंवार विद्यार्थ्यांची आंदोलने होत आहे. याच पंधरवड्यात सावरगाव (घाटंजी) येथील विद्यार्थ्यांनी बँड वाजवित रास्ता रोको केला होता.