माध्यमिक शिक्षणाधिकारी कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या
By admin | Published: July 22, 2016 02:11 AM2016-07-22T02:11:33+5:302016-07-22T02:15:29+5:30
वणी येथे अकरावी प्रवेशाचा गुंता निर्माण झाल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत आंदोलन केले.
अकरावी प्रवेशाचा गुंता : विद्यार्थ्यांची प्रचंड नारेबाजी
यवतमाळ : वणी येथे अकरावी प्रवेशाचा गुंता निर्माण झाल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देत आंदोलन केले. प्रवेश मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
वणीतील दोनशे विद्यार्थ्यांना यंदा अकरावीमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. यंदा दहावीचा निकाल उत्तम लागला. अनेकांनी ८० टक्केपेक्षा अधिक गुण घेतले आहेत. मात्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाने तब्बल ८४ टक्क्यांवरच प्रवेशप्रक्रिया ‘क्लोज’ केली आहे. या दोन्ही महाविद्यालयात अकरावीच्या अनुदानित तुकड्या आहेत. त्यामध्ये अनुक्रमे १२० आणि ८० असे दोनशे विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून महाविद्यालये सुरूही झाली आहेत. मात्र, अद्यापही दोनशे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.
वणीत यंदा अकरावीच्या वाढीव तुकड्या मंजूर झाल्या. मात्र, त्या स्वयंअर्थसहायित तुकड्या आहेत. तेथे प्रवेश घ्यायचा असल्यास शुल्क भरावे लागते. मात्र, शेतकरी, शेतमजूरांची मुले शुल्क भरण्यासाठी असमर्थ आहेत. त्यामुळे आपल्यालाही मोफतच प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ५ जुलै रोजी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी लवकरच प्रवेश मिळेल, असे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु, १५ दिवस लोटूनही मोफत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुन्हा दोनशे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यवतमाळात आले. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी कक्षात ठिय्या दिला.
‘लढा शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या हक्काचा’, ‘असा कसा मिळत नाही, भेटल्याशिवाय राहात नाही’ अशा नारेबाजीने शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक एकाच वेळी बोलत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात एकच हलकल्लोळ उडाला होता. स्वप्नील धुर्वे, विकेश पानघाटे, अखील सातोकर, प्रवीण खानझोडे, वैभव डंभारे, संदेश तिखट आदींनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले. (स्थानिक प्रतिनिधी)
याला फोन त्याला फोन...ऐकतो कोण?
विद्यार्थी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी विविध वरिष्ठांना फोन करून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला. मात्र, आता शुल्क भरण्याशिवाय या विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याचेच त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षांनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी फोन केला. बळीराजा चेतना अभियानातून, डीपीसीतून या विद्यार्थ्यांच्या शुल्काविषयी काही तजवीज करता येईल का, अशी विचारणा केली. मात्र, यावरही शिक्षणाधिकाऱ्यांना समाधानकारकरीत्या आश्वस्त करण्यात आले नाही.
वणीतील अनुदानित तुकड्यांमधील जागा भरल्या आहेत. आता विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाचे जे काही शुल्क असेल, ते विद्यार्थ्यांना भरावेच लागेल. त्याशिवाय दुसरा कोणताही तोडगा नाही.
- चिंतामण वंजारी शिक्षणाधिकारी, यवतमाळ