युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्यासाठी संघर्ष सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 05:00 AM2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:00:12+5:30
वैद्यकीय शिक्षण दर्जेदार तसेच कमी किमतीत उपलब्ध होते, त्यामुळे अनेक जण युक्रेनला पसंती देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी युक्रेनमधील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थीही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर यातील तीन विद्यार्थी यवतमाळमध्ये परतले आहेत. मात्र अद्यापही उर्वरित विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी या विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रशियाने युक्रेनवर युद्ध लादून आठ दिवस झाले आहेत. रशियाचे सैनिक आता युक्रेनमधील नागरी वस्त्यांवरही हल्ले करीत आहेत. वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी गेलेल्या यवतमाळमधील तीन विद्यार्थ्यांचा अशा स्थितीतही मायदेशी भारताकडे परतण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मेट्रो स्टेशन असो अथवा विमानतळ सगळीकडे रांगाच रांगा लागल्या आहेत. कसेही करून आम्हाला गावी पोहोचण्याची आस लागल्याचे या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वैद्यकीय शिक्षण दर्जेदार तसेच कमी किमतीत उपलब्ध होते, त्यामुळे अनेक जण युक्रेनला पसंती देतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी युक्रेनमधील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतात. यवतमाळ जिल्ह्यातील सात विद्यार्थीही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर यातील तीन विद्यार्थी यवतमाळमध्ये परतले आहेत. मात्र अद्यापही उर्वरित विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी या विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे. संकेत चव्हाण याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, युद्धानंतर येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. मी रुमानिया बॉर्डर पार केली आहे. मला येथे येण्यासाठी तब्बल ११ तास लागले. रस्त्यात ठिकठिकाणी सैनिकांनी तपासणी केली. सध्या एका हॉटेलमध्ये आम्हाला थांबविण्यात आले आहे. जेवणाची सुविधाही तेथे उपलब्ध करून देण्यात आली असून, काही भारतीय स्वयंसेवकही आम्हाला मदत करीत आहेत. या ठिकाणी साधारण तीन हजार विद्यार्थी असावेत, या सर्वांना आपल्या गावाकडे पोहोचण्याची ओढ लागल्याचे सांगत, पुढच्या दोन दिवसात मी यवतमाळला पोहोचेल, असे त्याने सांगितले.
युक्रेनमध्येच अडकलेल्या अभिनव काळे या विद्यार्थ्यानेही आता विमानतळ गाठले आहे. मागील तीन दिवस आमच्यासाठी अत्यंत त्रासदायक गेले. प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लावाव्या लागल्या. दोनवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला, आता विमानात जागा मिळेल, या प्रतीक्षेत असल्याचे तो म्हणाला. तर मोहम्मद मिरवले या विद्यार्थ्यानेही बुटरस्पेवरून निघून हँगरी विमानतळ गाठले आहे. हा सुमारे ११ ते १२ तासाचा प्रवास भयानक होता, असे सांगत प्रवासात प्रचंड हाल झाल्याचे तो म्हणाला. युद्ध सुरू झाल्यानंतर येेथे असलेले काही भारतीय कुक तातडीने मायदेशी परतले. त्यामुळे आमच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. मागील दोन दिवसात तो आणखीनच बिकट होऊन पाण्यासाठीही झुंजावे लागल्याचे त्याने सांगितले. हँगरी विमानतळाकडे जाताना रस्त्यात काही विद्यार्थ्यांना स्थानिक नागरिकांनी त्रास दिल्याचेही मिरवले याने सांगितले. दरम्यान, हे तीनही विद्यार्थी पुढील दोन दिवसात भारतात परततील.
अनेकांची उपासमार, रस्त्यावर झुंडी
- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची सरहद्दीवरील रुमानिया, पाेलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या ठिकाणी पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. अजूनही काही विद्यार्थी होस्टेल, घर किंवा बंकरमध्ये स्वत:ला कोंडून बसले आहेत. त्यामुळे अनेकांची उपासमारही होत आहे. युक्रेन बाहेर पडण्याचा सर्वांचाच प्रयत्न असल्याने रस्त्यावर हजारोंच्या झुंडी दिसत असल्याची स्थिती आहे.
तिघेही विमानतळावर
- युक्रेनमध्ये अडकलेले संकेत चव्हाण, अभिनव काळे आणि मोहंमद मिरवले हे तीनही विद्यार्थी सुरक्षितपणे युक्रेनशेजारील रुमानिया विमानतळावर पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत ते परतण्याची शक्यता आहे.
कुटुंबाशी साधला संवाद
- विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनही या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तहसीलच्या पथकाने युक्रेनमध्ये अडकलेल्या आणि घरी परतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी घरी जाऊन विचारपूस केली. आणखी तीन विद्यार्थी लवकरच सुरक्षित परततील, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी सांगितले.