शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 09:51 PM2019-07-15T21:51:16+5:302019-07-15T21:51:38+5:30
लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते.
सावरगाव येथे दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आहे. शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कित्येकदा निवेदन दिले. मात्र शिक्षण विभागाने कोणतेच पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळा डीजिटल केली. त्यामुळे पटसंख्येचा आलेख वाढत आहे. इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थी शाळेत दाखल होत आहे. यावर्षी १२५ विद्यार्थी आहे. सात वर्ग आहेत. मात्र शिक्षक केवळ दोनच आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मागील शैक्षणिक सत्रात केवळ एकच शिक्षक होते. परिणामी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे तीन शिक्षकांची तात्पुरती व एका कायम शिक्षकाची व्यवस्था केली होती. लवकरच स्थायी शिक्षक देण्याच्या आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आले होते. मात्र यावर्षी तात्पुरते नेमलेले शिक्षक परत आपल्या शाळेवर गेले. त्यामुळे या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना ठराव दिले. त्याचा काहीच लाभ झाला नाही. यामुळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास आरगुलवार, उपाध्यक्ष प्रकाश पाटील व गावकºयांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.
विद्यार्थी, पालक, गावकरी व शाळा समितीतर्फे सावरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. समिती व पालकांनी स्थायी शिक्षक मिळेपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली.
दोन दिवसात शिक्षक
आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती शिक्षण विभागाचे विजय चौधरी, एस.पी. लाकडे यांनी सावरगाव येथे धाव घेतली. त्यांनी येत्या दोन दिवसात कायमस्वरूपी शिक्षण देण्याची लेखी ग्वाही दिली. रुजू होण्यास टाळाटाळ करणाºया शिक्षकावर कारवाईचीही ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार, शैलेश इंगोले, नितीन नार्लावार, किरण प्रधान, किशोर गोविंदवार, रोहीदास पाटील, अजय एल्टीवार, मनोज कन्नलवार, गणेश मायकलवार आदी उपस्थित होते. ठाणेदार गोरख चौधर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.