क्रिकेटने घेतली विद्यार्थ्यांची विकेट
By admin | Published: March 27, 2016 02:24 AM2016-03-27T02:24:12+5:302016-03-27T02:24:12+5:30
सध्या टी-२० क्रिकेट विश्वचकष स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर लगेच आयपीएलच्या स्पर्धाही आहे. याच काळात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षाही आहेत.
द्विधावस्था : परीक्षेच्या काळात विश्वचषकाच्या थराराचा मोह
पुसद : सध्या टी-२० क्रिकेट विश्वचकष स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर लगेच आयपीएलच्या स्पर्धाही आहे. याच काळात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षाही आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या वेडापायी विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. क्रिकेटने विद्यार्थ्यांची विकेट घेतल्याची प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.
आजची युवा पिढी क्रिकेटला धर्म मानते. भारतात उन्हाळा-पावसाळा, हिवाळा अशा सगळ्या ऋतुंमध्ये दिवसभर क्रिकेट खेळले जाते. भारतीय क्रिकेट संघाचे असंख्य चाहते आहे. दहावी-बारावी हा शिक्षणाचा महत्वाचा टप्पा असतो. मात्र याच परीक्षांच्या काळात क्रिकेटची स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी द्विधावस्थेत पडले आहे. क्रिकेट पाहण्याचा मोह त्यांना अभ्यासापासून दूर नेत आहे. परंतु परीक्षा असल्याने क्रिकेट पाहणे टाळावे लागत आहे. त्यामुळे मुलांची चिडचिड वाढल्याचे आई-वडिल सांगत आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. एप्रिल महिन्यात सीईटीची परीक्षा आहे. १२ वीची मुले सीईटी परीक्षेची तयारी करीत आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार असल्याने क्रिकेट विश्वचषकाच्या गदारोळात विद्यार्थी परीक्षेत पराभूत होण्याची शक्यता आहे.
क्रिकेट स्पर्धा मार्च महिन्यात आयोजित झाल्याने व्यावसायिक, उद्योजक, नोकरवर्ग, शासकीय-अशासकीय कर्मचारी मार्च एन्डींगचा निपटारा करण्यासाठी दिवस रात्र एक करीत आहे. परिणामी तेही क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटू शकत नसल्याचे पहायला मिळत आहे. बहुसंख्य सामने दुपारी किंवा सायंकाळी आहेत. त्यामुळे नोकरवर्ग हवालदिल झाला आहे. क्रिकेट सामने व कामकाज सांभाळताना तारांबळ उडत आहे. (तालुका प्रतिनिधी)