‘वायपीएस’मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव
By admin | Published: July 13, 2017 12:14 AM2017-07-13T00:14:01+5:302017-07-13T00:14:01+5:30
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेत पार पडला.
विद्यार्थ्यांचे मनोगत : वेळेचे नियोजन आणि अभ्यासातील सातत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सीबीएसई दहावीच्या परीक्षेत टॉपर राहिलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेत पार पडला. विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना यशाचे गुपित सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून अँग्लो हिंदी हायस्कूलचे प्राचार्य मदनलाल कश्यप, माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, वायपीएसचे प्राचार्य जेकब दास उपस्थित होते. अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही मंचावर उपस्थिती होती. विदर्भातून प्रथम टॉपर नुपूर अग्रवाल व प्रणव काबरा (९९.०४ टक्के), द्वितीय टॉपर गौरी पांडे (९९.०२ टक्के), तृतीय टॉपर आशय इंदूरकर (९९ टक्के) यांनी यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वायपीएसच्या ४२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण घेतले. हिंदी विषयात दोन, संस्कृतमध्ये दहा, गणित विषयात सात, तर एसएसटीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण घेतले आहे. नुपूर अग्रवाल, प्रणव काबरा यांना ट्रॉफी व रोख पाच हजार ५०० रूपये, गौरी पांडे हिला ट्रॉफी व रोख चार हजार ५०० रूपये आणि आशय इंदूरकरला ट्रॉफी आणि रोख तीन हजार ५०० रूपयांचे बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही वायपीएसतर्फे ट्रॉफी आणि रोख बक्षीस देवून गौरविले गेले. आंतरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पूर्वा बोढलकर हिचाही या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
नुपूर अग्रवाल, प्रणव काबरा, गौरी पांडे, आशय इंदूरकर यांच्या मनोगताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. अभ्यासातील सातत्य, दृढ इच्छाशक्ती, अभ्यासातील नियोजन, वाचन, या बाबी यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आई, वडिलांना गर्व वाटावा असेच कार्य आपण केले पाहिजे, असे विचार आशय याने मांडले. प्रसंगी शंकरराव सांगळे, मदनलाल कश्यप, जेकब दास, समन्वयक अर्चना कढव आदींनी विचार व्यक्त केले. संचालन व आभार संध्या सुब्रम्हण्यम यांनी मानले. शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.