बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:15 PM2024-06-17T13:15:20+5:302024-06-17T13:15:46+5:30

शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते. 

students will get a pass of st bus at school | बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे

बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासिका बुडवून पासकरिता रांगेत उभे राहावे लागणार नाही. राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.    

परगावातील शाळेत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो. शिवाय, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते. 

अभ्यास नाही बुडणार
- पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात. 
- या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ तासिका करण्यास मदत होणार आहे.

त्रासापासून सुटका होणार 
पाससाठी दरमहा विद्यार्थी, विद्यार्थिनींना बसस्थानकावर  येऊन रांगेत उभे राहून किंवा गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावा लागत होता. महामंडळाच्या निर्णयाने या त्रासापासून सुटका होणार आहे.

मंगळवारपासून  विशेष मोहीम
एसटी पास थेट तुमच्या शाळेत’, ही विशेष मोहीम १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र दिले आहे.  शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहे.

विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत पास वितरित केला जाणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना एसटीच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. काही शाळा सुरू झाल्या असल्याने पासेस वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
- डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Web Title: students will get a pass of st bus at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.