वन्यप्राण्यांमुळे हानीच्या मोबदल्याचा अभ्यास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 09:35 PM2019-06-23T21:35:11+5:302019-06-23T21:35:50+5:30
हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुराचे मोठे नुकसान होत आहे. जंगल परिसरातील अनेकांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला आहे. हे आर्थिक नुकसान निश्चित करून त्याचा मोबदला किती द्यायचा हे ठरविण्यासाठी वन विभागाने हे स्वतंत्र अभ्यास समिती गठित केली आहे. या समितीत १३ सदस्य आहेत. विविध गावांमधून शेतकऱ्यांशी चर्चा करून समिती मोबदला देण्याचे निकष ठरविणार आहे.
वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचा शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर शेताकडे फिरकू शकत नाहीत. परिणामी शेतातील कामे खोळंबतात. याचा उत्पादनावर परिणाम होतो. शेतमजुरांची दैनंदिन मजुरी बुडते. याचा अभ्यास करून आर्थिक मोबदला देण्याचे निकष ठरविण्यात येणार आहे. शिवाय नुकसानीची ओळख पटविण्याकरिता, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नुकसानभरपाई देण्याकरिता अटी व शर्थी निश्चित केल्या जाणार आहेत. वन्यप्राण्यांपासून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याकरिता इतर काही राज्यांनीही निकष ठरविले आहे. तेथील विविध पद्धतींचा अभ्यास करून महाराष्टÑात गठण करण्यात आलेली समिती अहवाल तयार करणार आहे. समिती वन्यप्राण्यांच्या नुकसानीसंदर्भात अभ्यास करून स्पष्ट अहवाल तीन महिन्याच्या आत राज्य शासनाकडे सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर हे आहेत. सदस्यांमध्ये विनोद तिवारी, तसनीम अहमद, संजीव गौड, आर.के. वानखडे, गजेंद्र नरवने, अॅड. फिर्दोस मिर्झा, सुहास तुळजापूरकर, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मुग्धा चांदूरकर, इम्तियाज खैर्दी, नितेश भुतेकर, मोहन जाधव, रवीकिरण गोवेकर यांचा समावेश आहे.
वन्यप्राण्यांच्या नुकसानीला विमा संरक्षण
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणे अथवा शेतातील पिकांचे नुकसान होणे यासाठी विमा संरक्षण योजना कार्यान्वित करता येऊ शकते का याचाही अभ्यास समिती करीत आहे. तसे झाल्यास हवामान विम्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांंना आपल्या पिकांचा विमा उतरवून वन्यप्राण्यांनी पीकाचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई विम्याच्या स्वरूपात मिळविता येणे शक्य होईल का याची पडताळणी सुरू आहे.