साप्ताहिकाच्या संपादकास उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:36+5:302021-08-20T04:48:36+5:30
गोपाल बळीराम जिरोणकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जावर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात उपविभागीय अधिकारी ...
गोपाल बळीराम जिरोणकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जावर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यात उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी एका साप्ताहिकाच्या संपादकाला अश्लील भाषेतील बातमी प्रकाशित केल्याबद्दल विचारणा करून, यापुढे असा प्रकार घडू नये, अशी तंबी दिली.
साप्ताहिकाच्या संपादकाने लिपिक गोपाल जिरोणकर यांच्याविरुद्ध ५ फेब्रुवारी, तसेच १६ जुलै २०२१ च्या अंकात अत्यंत अश्लील भाषेतील वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे वन विभाग व नातेवाइकांमध्ये आपली बदनामी झाली असून, आपण प्रचंड मानसिक दडपणामध्ये जीवन जगत असल्याची तक्रार त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यातून त्या साप्ताहिकाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.
या अहवालावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी बुधवारी सुनावणी ठेवली होती. त्यांनी कागदपत्रांचे निरीक्षण करून साप्ताहिकाचे संपादक राजू राठोड यांना एकाच व्यक्तीविरुद्ध वारंवार तक्रारी करण्यामागील हेतू काय? असा प्रश्न विचारत अश्लील भाषेतील बातमीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. यापुढे असा प्रकार घडू नये, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी तंबी दिली.
बॉक्स
तक्रारीत तथ्य नाही
वन विभागातील लिपिक
गोपाल जिरोणकर यांच्याबद्दल एका सप्ताहिकाच्या संपादकाने केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. त्या तक्रारीत तथ्य नसल्याचे संबंधिताला कळविले आहे, असे उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे यांनी सांगितले.