उपअभियंत्याचा निवडणूक कर्तव्यावर दारूच्या नशेत गोंधळ
By विशाल सोनटक्के | Published: April 18, 2024 09:03 PM2024-04-18T21:03:35+5:302024-04-18T21:03:56+5:30
उमरखेड येथील घटना : गुन्हा नोंदवून पोलिसांनी केली अटक
यवतमाळ: निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने दारूच्या नशेमध्ये धिंगाणा घातला. ही घटना उमरखेड येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी माधव उघडे (वय ५०) यांना ताब्यात घेतले आहे. ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव येथे कार्यरत आहेत.
ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाणाऱ्या साहित्याची सिलिंग करून मॉकपोल घेणे व तयार केलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या नोंदी ठेवण्याचे काम तहसील कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदाम क्रमांक २ येथे सुरू असताना उपअभियंता माधव गोविंद उघडे यांनी दारूच्या गोंधळ घातला. या घटनेची नोंद उपविभागीय अधिकारी डॉ. मुळे यांनी तत्काळ घेतली. या प्रकरणी नायब तहसीलदार वैभव विठ्ठल पवार यांनी उमरखेड पोलिसांमध्ये दिली. त्यावरून उमरखेड पोलिसांनी माधव उघडे यांच्याविरुद्ध कलम १३४ लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ व कलम ८५ दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक संबंधाने टेबल क्रमांक २७ वर काम करण्याचे निर्देश उघडे यांना दिले असता त्यांनी काम करण्यास नकार दिला. नंतर निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू केले असता, त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र चुकीच्या पद्धतीने सिलिंग केली. टेबलवरील त्यांचे सहकारी कर्मचारी तलाठी पंजाबराव सानप यांनी ही बाब वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर या कामात दुरुस्ती करण्यास सांगितले असता, त्यास नकार देत उघडे यांनी गोंधळ घातल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मद्यपानाच्या अनुषंगाने कुटीर रुग्णालय उमरखेड येथे तपासणी करण्यात आली असून, हे नमुने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.