सोसायटी निवडणुकीतील विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा; मधमाशांनी अचानक चढवला हल्ला अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 12:21 PM2022-04-26T12:21:26+5:302022-04-26T12:38:37+5:30

ही घटना सोमवारी दुपारी घडली.

Sub-Punch killed in bee attack in yavatmal district | सोसायटी निवडणुकीतील विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा; मधमाशांनी अचानक चढवला हल्ला अन्..

सोसायटी निवडणुकीतील विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा; मधमाशांनी अचानक चढवला हल्ला अन्..

Next

मुुकुटबन (यवतमाळ) : सोसायटी निवडणुकीत ६५ वर्षीय आई मोठ्या मताधिक्याने विजयी झाली. एवढेच नव्हे तर पॅनलमधील १३ पैकी १३ उमेदवारांनी निवडणूक जिंकत पॅनलला एकतर्फी विजय मिळवून दिला. या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करून दुसऱ्याच दिवशी मुकुटबन येथे पेढे वाटण्यासाठी गेलेल्या उपसरपंचांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

येडशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भोला नगराळे यांची आई अडेगाव सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उभी होती. दोन पॅनलमध्ये रविवारी (दि.२४) सकाळी ८ वाजल्यापासून चुरशीने मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी ४ नंतर मतदान केंद्रावरच मतमोजणी घेण्यात आली. या भोला नगराळे यांच्या आईसह त्यांच्या पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले. सायंकाळी विजयी उमेदवारांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.

उपसरपंच नगराळे यांना तर मोठा आनंद झाला होता. पॅनल निवडून येतानाच ६५ वर्षीय आईही चांगल्या मताधिक्याने निवडून आली होती. त्यामुळेच सोमवारी सकाळीच ते मोटारसायकलवरून मुकुटबनला निघाले. जाताना पेढ्याचे बाॅक्सही सोबत घेतले. मित्रमंडळींसह आप्तस्वकीयांसोबत सोसायटी निवडणुकीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी मुकुटबन गाठले. तेथे त्यांनी पेढे वाटप करून आईच्या विजयाचा आनंदही साजरा केला. त्यानंतर ते मोटारसायकलवरून आडेगावमार्गे येडशीकडे निघाले होते. मात्र येथेच घात झाला.

रस्त्याशेजारील झाडावरील मधमाश्यांचा पोळ एकदम उठला आणि तो घोंगावत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असतानाच उपसरपंच नगराळे या पोळ्याच्या जाळ्यात सापडले. मधमाशांनी नगराळे यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, नगराळे हे जागेवरच बेशुद्ध पडले. काहीजणांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी भोला नगराळे यांना तातडीने मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी करून भोला नगराळे (४८) यांना मृत घोषित केले. उपसरपंच भोला नगराळे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

गावावर पसरली शोककळा

येडशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेल्या भोला महादेव नगराळे परिसरात सुपरिचित होते. याच दांडग्या जनसंपर्काच्या बळावर अडेगाव सहकारी सोसायटीतून त्यांनी आईला मोठ्या मताधिक्याने निवडून आणले होते. मात्र, विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना मधमाश्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मुकुटबनसह अडेगाव आणि येडशी ग्रामस्थांना समजल्यानंतर एकच शोककळा पसरली.

Web Title: Sub-Punch killed in bee attack in yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.