अनुदानाने फुगलेला अर्थसंकल्प
By Admin | Published: February 25, 2015 02:18 AM2015-02-25T02:18:30+5:302015-02-25T02:18:30+5:30
नगरपरिषदेने २०१४ - १५ यावर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
यवतमाळ : नगरपरिषदेने २०१४ - १५ यावर्षाचा सुधारित अर्थसंकल्प तर २०१५-१६ चा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. १०३ कोटींच्या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष उत्पन्नापेक्षा शासकीय अनुदानाचीच वाढीव गोळाबेरीज करण्यात आली आहे. खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी येणाऱ्या अनुदानाचे आकडे फुगविण्यात आले आहेत.
आठवडी बाजार आणि दैनिक बाजार वसुलीच्या उत्पन्नातही अशीच तफावत आहे. शासकीय अनुदानातून प्राप्त होणाऱ्या रकमेत राष्ट्रीय मत्स्यीकी विकास अनुदान थेट दोन कोटी दाखविण्यात आले आहे. यापूर्वी ५० लाखांपैकी केवळ १८ लाख मिळाले आणि ३१ लाख येतील असे दाखविण्यात आले आहेत. नगरपरिषद हद्दवाढ वाढीव क्षेत्र विकास कामांचे एक कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. याच प्रमाणे बांधकाम शुल्कातही घसघशीत वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. शासनाकडून अनुदाने व अंशदानापोटी २२ कोटी ३४ लाख २७ हजार मिळतील असे दाखविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे बजेटमध्ये नगराध्यक्षांच्या अधिकारातील आकस्मिक निधी खर्चाला कात्री लावत २० लाखावरून १५ लाख करण्यात आले आहे. स्वच्छता अभियानाची तरतूद ३० लाखावरून आठ लाख इतकीच करण्यात आली आहे. आकस्मिक पाणी पुरवठ्याच्या बजेटमध्ये तब्बल दहा पटीने वाढ करीत दोन लाखावरून थेट १२ लाखाची तरतूद केली आहे. वीज बिलचा खर्चही २५ लाखावरून एक कोटी होईल असे दाखविण्यात आले आहे. संगणक खरेदीसाठी नव्याने दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी मंजूर केलेल्या दहा लाखांपैकी केवळ नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन लाख खर्च झाल्याचे दाखविले आहे. अनेक योजनांवर प्रस्तावित निधीच खर्च झालेला नाही. अर्थसंकल्पातील तूट लक्षात येऊ नये यासाठी पध्दतशीरपणे आकडेमोड करण्यात आली आहे. यावर २६ फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदस्य काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)