यवतमाळ जिल्ह्यात ‘पोखरा’ योजनेचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 02:06 PM2018-07-02T14:06:55+5:302018-07-02T14:08:20+5:30
हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत यवतमाळ तालुक्यातील १४ गावांत प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत यवतमाळ तालुक्यातील १४ गावांत प्रारंभ करण्यात आला.
‘प्रोजेक्ट आॅन क्लयामेट रिजीनल अॅग्रीकल्चर’ (पोखरा) प्रकल्प राज्य शासन ‘नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प’ या नावाने राबवित आहे. ‘जीपीएस आणि वॉटरशेड मॅप’च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० गावांची त्यासाठी निवड झाली.
योजनेचा शुभारंभ यवतमाळ तालुक्यातील १४ गावांतून करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर ही योजना १०० टक्के यशस्वी झाली आहे. निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीतच ही योजना पूर्ण झाली. आता पहिल्या टप्प्याचे नियोजन केले जात आहे.
७६ गावांमध्ये योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी निवड करण्यासाठी गावात ग्राम कृषी संजीवनी समिती निर्माण केली जाते. या समितीने ठराव घेऊन निवडलेले लाभार्थीच योजनेसाठी पात्र ठरतात.
यातून वानिकी आधारित शेती अंतर्गत १२ फळझाडांची लागवड करता येते. क्षारपड व चोपन जमिनीचे व्यवस्थापन, फळशेती, एकात्मिक शेती पद्धतीत शेळी, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षीका, मत्स्यपालन, जमीन आरोग्य सुधारणे अशा अनेक योजनांचा यात समावेश आहे.
यासाठी जागतिक बँकेडून चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळाले आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने कृषी विभागाने पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे. ही योजना आता ३०० गावात राबविली जाणार आहे.