पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने विदर्भातील उसावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:21 PM2019-08-29T12:21:56+5:302019-08-29T12:23:23+5:30
विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पश्चिम महाराष्ट्रात उसाचे लागवड क्षेत्र ९० टक्केपर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम या भागातील साखर कारखान्यावर होत आहे. मात्र विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भरवशावर चालत होते. आता विरोधाभासी चित्र आहे. आता कारखान्यांची गर्दी असलेल्या भागानेच ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरविली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे आज क्षेत्र ९० टक्के घटले आहे. विदर्भातील उसही पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची आवश्यक तेवढी गरज भागवू शकणार नाही. या कारणांमुळे ६० टक्के कारखाने बंद पडण्याचा धोका आहे.
विदर्भातील ऊस लागवडीने आज औरंगाबाद विभागालाही मागे टाकले आहे. विदर्भात सहा हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. औरंगाबाद विभागात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात सहा हजार हेक्टरातच लागवड थांबली. नियोजनाच्या केवळ १० टक्के क्षेत्रातच ही लागवड झाली आहे.
कोल्हापूर विभागात दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लागवड क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. यातही पूर परिस्थितीने ८० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही. पुणे विभागात तीन लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. आज प्रत्यक्षात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला. नाशिक विभागात २५ हजार हेक्टर, तर कोकणात २८५ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात नऊ लाख चार हजार हेक्टरवर ऊसाची लागवड होते. यावर्षी एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे. हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा ९० टक्क्यांने कमी आहे. दहा टक्के उसावर कारखाने चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र
यवतमाळ जिल्ह्यात चार हजार २४२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. नागपुरात १५४४ हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला. बुलडाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे.
धान पट्ट्यातही ऊस
उसाला अधिक पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे. याचे मोठे बदल पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईने उसाची लागवड घटली आहे.