कृष्णेच्या तीरी साखर विरघळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:06 PM2019-08-14T13:06:15+5:302019-08-14T13:18:39+5:30
राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर, सांगली आणि कराडला मोठा फटका बसला. या ठिकाणावरून राज्यभरात साखर आणि गुळ पोहचविला जातो. परंतु, पुरामुळे मोठ्या प्रमाणात साखर आणि गुळाचे पाणी झाले. यातून राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.
गतवर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे साखरेची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. यानंतरही पुरेशा प्रमाणात निर्यात झाली नाही. अखेरीस साखरेचा कोटा राज्यातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम राहिला. साखर कारखान्यातील साखर ठोक विक्रेत्यांकडे जाते. त्यातून चिल्लर विक्रेते साखरेची खरेदी करतात. त्यानंतर ती इतर दुकानामध्ये पोहचते. साखर मुबलक प्रमाणात असल्याने वर्षभरापासून साखरेचे दर स्थिर होते.
आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता होती. मात्र कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने साखर आणि गुळ साठ्याचे संपूर्ण गणितच बिघडविले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी गोदामामध्ये शिरले. साखर आणि गुळाचे पाणी झाले. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यातून तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे राज्यभरात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ३३ ते ३४ रूपये किलो असलेली साखर ३६ रूपयांवर पोहोचली आहे. तर गुळाचे दर ३६ ते ३८ रूपये किलोवरून ४२ ते ४३ रूपये किलोवर पोहचले आहेत. पुढे हे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात उठाव वाढला आहे. गत १५ दिवसांपासून राज्यात होणारा साखरेचा पुरवठाही थांबला आहे. यातून साखरेचा आणि गुळाचा गोडवा सण उत्सवात कडू होण्याचा धोका आहे.
ऐन सण उत्सवातच झळ
सण उत्सवाला सुरूवात होतानाच साखर आणि गुळाचे मोठे संकट उभे झाले आहे. यामुळे येणाºया काळात पोळा, गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळीच्या सणात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
ऊसाचे केवळ १० टक्के क्षेत्र
यावर्षी मराठवाड्यात पाऊस पडलाच नाही. यामुळे या पट्ट्यातील ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या १० टक्के क्षेत्रातच ही लागवड नोंदविली गेली आहे. ९० टक्के क्षेत्र इतर पिकाच्या लागवडीखाली आले आहे. यामुळे येणाºया काळात उत्पादनावर परिणाम होणार आहे.
पूरपरिस्थितीमुळे साखरेचा कोटा घटला. परंतु यावर्षी ऊसाची लागवड न झाल्याने पुढच्या वर्षी आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची व दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- दत्तात्रय गायकवाड, उपायुक्त (साखर), पुणे
पुरामुळे साखर उत्पादक जिल्ह्यात ४० टक्के साखरेचे नुकसान झाले आहे. यावेळी १९ लाख क्विंटल साखर पाठविण्यात आली. यामध्ये दोन लाख क्विंटलची तफावत आहे. यामुळे दीड वर्षांपासून स्थिर असलेली साखर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढली आहे.
- रोहित सिंघानिया, साखरेचे ठोक विक्रेता, यवतमाळ