जिल्ह्यात ११ रूपयांनी स्वस्त साखर लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:35 PM2018-12-18T22:35:39+5:302018-12-18T22:36:22+5:30
लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लेव्हीची साखर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांनी ही साखर देण्याची तयारी दर्शविली आहे. उपलब्ध झालेली ही साखर मिळविण्यासाठी पुरवठा विभागाला स्वत: उचल करावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे शासनाचे प्रती किलोवर ११ रूपये वाचणार असून जिल्ह्यातील ग्राहकांनाही स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त साखर मिळणार आहे.
लेव्हीची साखर न मिळाल्याने दरवेळी बोली बोलून शासन साखर खरेदी करते. ही साखर ३० रूपये किलो पडते. दुकानातून २० रूपये किलो विकली जाते. लेव्हीची साखर जागेवरूनच १९.८८ पैशाने मिळणार आहे. यामुळे शासनाचे किलोमागे ११ रूपये वाचणार आहेत.
एकूण निर्मित साखरेपैकी काही कोटा आरक्षित करून तो लेव्हीच्या मदतीने स्वस्त धान्यदुकानाला पुरवायचा असतो. मात्र कारखाने अशी साखर उपलब्ध असल्याचे कधी सांगतच नाही. यावेळी कारखान्याने लेव्हीची साखर उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ही साखर पाठविण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाही. यामुळे पुरवठा विभाग ही साखर जिल्ह्यात आणणार आहे. त्या दृष्टीने पुरवठा विभागाने संपूर्ण नियोजन केले आहे. जिल्ह्याला दोन महिन्यांचा चार हजार क्विंटलचा कोटा मिळणार आहे. यामुळे शासकीय तिजोरीचा भुर्दंड टळणार आहे. ग्राहकांना साखर उपलब्ध होणार आहे. ११ रुपयांनी स्वस्त साखरेचा लाभ होणार आहे.
गैरप्रकारावर आळा
स्वस्त धान्य दुकानदारांनी ज्या महिन्याचे धान्य, त्याच महिन्यात वितरित करण्याच्या सूचना आहेत. यानंतरही धान्य शिल्लक राहिल्यास पुढील महिन्याच्या कोट्यात लोकसंख्येनुसार नव्याने धान्य देताना शिलकीचा कोटा वजा करून धान्य दिले जाणार आहे. यामुळे धान्य दुकानातील गैरप्रकारालाच आळा बसणार आहे.
तूर डाळ, चणा डाळ आली
जिल्ह्यात तूर, उडीद आणि चणाडाळीचा पुरवठा करण्यात आला आहे. सात हजार ४८६ क्विंटल तूरडाळ, ११९५ क्विंटल चणाडाळ आणि ४९९ क्विंटल उडीद डाळीचा पुरवठा झाला आहे. मात्र चार हजार क्विंटल साखरेचा पुरवठा बाकी आहे.
लेव्हीची साखर पुरवठादारामार्फत जिल्ह्यात आणली जाणार आहे. स्वस्त धान्य दुक ानातून ती वितरित करण्यात येणार आहे. डाळीचा जिल्ह्याला पुरवठा झाला आहे. ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात वितरित करण्याच्या सूचना आहेत.
- शालीग्राम भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ