सिंदी येथे शेतातील ऊसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 09:50 PM2019-02-28T21:50:47+5:302019-02-28T21:51:45+5:30
बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घारफळ : बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले.
शेतकऱ्यांना दुष्काळ, महापूर, जंगली जनावरे यांच्यापासून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते. रात्र जागून शेतकरी पिकांचे रक्षण करतात. यंदा दुष्काळामुळे श्ेतकरी आधीच मेटाकुटीस आले आहे. यातून बाहेर निघण्यासाठीच सिंदी येथील नागेश ठाकरे यांनी दोन एकर शेतात उसाची लागवड केली. पीक ऐन बहरात आहे.
बुधवारी रात्री ते शेतातील मोटारपंप सुरू करण्याकरिता गेले होते. मोटारपंप सुरू करून परत येत असताना शॉर्ट सर्किट झाले आणि संपूर्ण ऊस त्यांच्या डोळ्यासमोरच खाक झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी वीज वितरणचे उपशाखा अभियंता जी.पी. खडगी, लाईनमन राजू इंगळे, सिंदीचे तलाठी दाबेरे, कृषी सहायक जाधव यांनी शेत व नुकसानीची पाहणी केली. ठाकरे यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या आगीने ठाकरे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.