हजारो हेक्टरातील ऊस अद्यापही उभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:58 PM2018-01-28T21:58:18+5:302018-01-28T21:58:38+5:30
जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतातील ऊस पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र आहे.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. गुंज येथील साखर कारखाना अवसायनात जाऊन खासगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. तर पोफाळी येथील साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून यंदा तर अद्यापही गाळपाला प्रारंभ झाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यात शेतकऱ्यांचा ऊस आजही मोठ्या प्रमाणात शेतात उभा आहे. अनेक शेतकऱ्यांचाच तर नोंदणी केलेला ऊसही कारखाने तोडायला तयार नाही. शेतकरी कारखान्याचे उंबरठे झिजवित आहे. परंतु त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. शेतात उभा असलेला ऊस वाळत असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे. गतवर्षीपर्यंत साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसत होती. उसाची पळवापळवी सुरू होती. परंतु यंदा साखर कारखान्यात स्पर्धाच दिसत नाही. शेतकरी ऊस घेऊन जा असे सांगत असतानाही कारखाने टोळ्या पाठवायला तयार नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस जाळण्याचा निर्णय घेतला आहे. डोळ्यात अश्रू आणून शेतकरी आपला ऊस जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.
साखर आयुक्तांकडून पुढाकाराची गरज
महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील अधिक रिकव्हरी देणाऱ्या उसाला साखर कारखाने पसंती देत आहे. गुंज येथील नॅचरल शुगर रिकव्हरी देणारी ऊसच उचलत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. साखर आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्याची गरज आहे.