घाटंजीत प्रेमीयुगुलाची विहिरीत आत्महत्या
By Admin | Published: January 18, 2015 10:47 PM2015-01-18T22:47:29+5:302015-01-18T22:47:29+5:30
घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.
कुटुंबीयांचा लग्नास विरोध : ओढणीने एकमेकांना बांधून घेतली उडी, परिसरात हळहळ
घाटंजी : घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्याने नात्याने आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना घाटंजी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी या दोघांनीही एकमेकांना ओढणीने बांधून उडी घेतली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून विहिरीवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
श्रीकांत अवधूत डगमल (२५) रा. घाटी घाटंजी आणि सुवर्णा भास्कर नारनवरे (२०) रा. बेलोरा (नवोदय) ता. घाटंजी असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. नात्याने चुलत आतेबहीण-मामेभाऊ असलेल्या सुवर्णा आणि श्रीकांत दोन-तीन वर्षापूर्वी एकमेकांच्या प्रेमात पडले. सोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या. फुलत असलेल्या या प्रेमाला मात्र घरच्यांचा विरोध होता. नात्यात असूनही घरचे विरोध करीत होते. त्यामुळेच त्यांनी एकसाथ जगता येत नाही, पण एकसाथ मरता येईल असा विचार केला. घाटी येथील बाजार समितीच्या बैलबाजार भरणाऱ्या परिसरात असलेल्या विहिरीत दोघांनी एकमेकांना ओढणीने बांधून उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. परिसरातील काही लोकांना विहिरीजवळ एका प्लास्टिकमध्ये ब्लाऊज कापड, दोन मोबाईल आदी वस्तू आढळून आल्या. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन विहिरीत शोध घेतला असता एकमेकांना बांधलेल्या अवस्थेतील सुवर्णा आणि श्रीकांतचे प्रेत आढळून आले. घटनेची माहिती घाटंजीत पोहोचताच अनेकांनी या विहिरीकडे धाव घेतली.
सुवर्णा ही यवतमाळ येथे शिवणक्लास करीत होती. ती यवतमाळातच एका नातेवाईकाकडे राहत होती. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास यवतमाळवरून परस्पर घाटंजीत आली तर श्रीकांत हा घरुन सायंकाळी ५ वाजता बाहेर निघून गेला होता.
श्रीकांत हा दहावीपर्यंत शिकलेला होता. तो गवंडी कामावर रोजंदारीने काम करीत होता. सुवर्णाचे आई-वडील बेलोरा येथे रोजमजुरी करतात. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास ठाणेदार भारत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश मार्इंदे, जमादार एस.के. दुबे, एस.सी. वाघाडे अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)