आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीची दहावीत बाजी, हिवराच्या समीक्षाला मिळाले ९६.२० टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 08:11 PM2018-06-10T20:11:08+5:302018-06-10T20:11:08+5:30
आर्थिक विवंचनेने वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब खचून गेले. आईने धीराने तीनही मुलींना शिकविले.
- विजय बोंपीलवार
हिवरासंगम (यवतमाळ) : आर्थिक विवंचनेने वडिलांनी दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली. संपूर्ण कुटुंब खचून गेले. आईने धीराने तीनही मुलींना शिकविले. आईच्या कष्टाचे चीज करीत तीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९६.२० टक्के गुण घेतले. समीक्षा सुधाकर आंडगे असे या गुणी विद्यार्थिनीचे नाव असून ती महागाव तालुक्यातील हिवरासंगमची आहे.
समीक्षाचे वडील सुधाकर आंडगे यांनी दहा वर्षापूर्वी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळी समीक्षा पहिल्या वर्गात शिकत होती. वडिलांचे पितृछत्र हरविल्यानंतर या तीनही मुलींचा सांभाळ आई शारदाने केला. शेतमजुरी करून तिने आपल्या मुलींचे योग्य संगोपन केले. कोणत्याही संकटात न डगमगता तीनही मुलींना शिकविले. मुलीच तिचे भविष्य होते. या मुलींनाही आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती.
नुकताच दहावीचा निकाल लागला. त्यात समीक्षाने ९६.२० टक्के गुण घेतले. एका ग्रामीण भागातील आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलीने मिळविलेले हे यश सर्वांसाठी आदर्शच आहे. तिला जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे, मुख्याध्यापक मुकुंद पांडे, सरपंच प्रवीण जानकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आता खरी गरज आहे ती समीक्षाच्या उच्च शिक्षणासाठी मदतीची. एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील समीक्षाला उच्च शिक्षणासाठी समाजातील दात्यांनी पुढे यावे, या गुणी मुलीला भविष्य घडविण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे.