यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:55 AM2018-01-10T10:55:29+5:302018-01-10T10:56:13+5:30
घाटंजी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घाटंजी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. राजश्री श्रीरंग कोटनाके (रा.मोवाडा, ता.घाटंजी) असे तिचे नाव असून वसतिगृहातच पंख्याला ओढणी बांधून तिने गळफास लावला.
आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडाअंतर्गत रामपूर येथील या आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक शाळेच्या पटांगणावर प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहात गेले असता राजश्री गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. विद्यार्थिनींनी हा प्रकार शिक्षकांना सांगितला. राजश्रीला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून घाटंजीला हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. राजश्रीजवळ एक चिठ्ठी आढळल्याचे सांगितले जाते. त्यात नमूद बाबी मात्र कळू शकल्या नाही. राजश्री याच वर्षी या वसतिगृहात शिक्षणासाठी आली होती.
अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आश्वासन
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जे.के. हामंद यांनी रुग्णालयाला भेट दिली. पांढरकवडा प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी (आयएएस) यांनीही राजश्रीच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी चर्चा केली. माजी सरपंच मोतीराव कन्नाके यांनी या आश्रमशाळेचे कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याची तक्रार केली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन भुवनेश्वरी यांनी दिले.