उच्चशिक्षित तरुणाच्या आत्महत्येने समाजमन सुन्न
By admin | Published: March 17, 2017 02:46 AM2017-03-17T02:46:53+5:302017-03-17T02:46:53+5:30
बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल
शेलूची घटना : ज्ञानेश्वर झाला होता बी.टेक.
प्रकाश लामणे पुसद
बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल आणि कुटुंबाला चांगले दिवस येतील, असा भक्कम आशावाद, पण नियतीच्या मनात काही वेगळेच. बीटेक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने काही कळायच्या आत आपली जीवनयात्रा संपविली. अपंग वडिलांचा आधार आणि आईची आशाच संपली. या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले.
ज्ञानेश्वर विठ्ठल मस्के (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पुसद तालुक्यातील शेलू बु. या लहानशा गावात तो राहात होता. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. पोटाला चिमटा देवून आई-वडिलांनी त्याला शिकविले. ज्ञानेश्वरने इयत्ता दहावीत व बारावीत ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले. पुसदच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातून त्याने बीटेक केले. चार वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या तो बारामतीत एका खासगी कंपनीत नोकरीला होता. ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती जेमतेम. वडील विठ्ठलरावच्या नावावर कोरडवाहू एक एकर जमीन. त्यातच ते अर्धांगवायूने पीडित. आईने मोलमजुरी करून या चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरला कमी पडू दिले नाही. मुलानेही नाव कमावले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. ज्ञानेश्वर महिन्या-दोन महिन्याने गावी आई-वडिलांच्या काळजीने येत होता. यावेळीही तो ९ मार्चला शेलूला आला. होळी आणि रंगपंचमी झाल्यानंतर बारामतीला जाणार होता. आई-वडील ज्ञानेश्वरच्या येण्याने सुखावले होते. कारण तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार होता. मात्र १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता काळाने डाव साधला.
आई रुक्मिणीबाई शेतात कामाला गेली होती. वडील विठ्ठल अपंग असल्याने ते घराच्या ओसरीत बसून होते, तर ज्ञानेश्वर एकटाच घरात टीव्ही पाहात होता. काही कळायच्या आत ज्ञानेश्वरने कंबरपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. हुशार व चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अनुत्तरितच आहे. पोलीस या कारणांचा शोध घेत आहेत.
शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रूंचा पूर दाटला होता.
जगण्याचा आधार गेला
एकुलता एक ज्ञानेश्वर आम्हाला सोडून गेला. आता आम्ही कोणासाठी जगावं, असा टाहो त्याची आई रुक्मिणीबाई फोडते तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. रुक्मिणीबाई केवळ ज्ञानेश्वर...ज्ञानेश्वर... म्हणून हंबरडा फोडत आहे. आमच्या जगण्याचा आधारच गेला, असे म्हणत ती अश्रूंना वाट मोकळी करते.