सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:18 PM2018-09-21T22:18:56+5:302018-09-21T22:19:23+5:30
सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली.
शेख अर्शद (१४) व शेख सुफिर शिराज (१६) अशी मृतांची नावे असून या दुर्घटनेत सय्यद उमेद (१८) याची प्रकृती गंभीर झाली आहे. त्याला उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे. हे सर्वजण आदिलाबाद येथील रहिवासी आहेत. मोहरम सणानिमित्त आदिलाबाद येथील शेख अर्शद, शेख शिराज व सय्यद उमेद यांच्यासह पाचजण बुधवारी राजूर (गोटा) येथे नातलगांकडे आले होते.
गुरूवारी सकाळी ९ वाजता हे पाचही युवक राजूर येथील सवारी बंगल्याच्या मागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. या नदीत एक नाव उभी होती. त्यामुळे या पाचही जणांना नावेत बसून सेल्फी काढण्याची इच्छा झाली. लगेच हे पाचही जण नदीत उभ्या असलेल्या नावेत चढले आणि येथेच घात झाला.
हे युवक सेल्फी काढत असताना अचानक नाव उलटली आणि पाचही युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यापैकी दोघांना पोहता येत असल्याने ते पाण्याबाहेर पडले. मात्र शेख अर्शद व शेख सुफिर शिराज यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सय्यद उमेद याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याच्यावर मुकूटबन येथे प्राथमिक उपचार करून नंतर आदिलाबाद येथे हलविण्यात आहे.