शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 07:46 PM2023-05-23T19:46:38+5:302023-05-23T19:47:03+5:30

Yawatmal News एका छोट्याशा खेड्यात जन्म घेवून पुसदच्या मराठी शाळेत शिकून मुंबईत डाॅक्टर झाल्यावरही आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जखमी पायांवर उपचार करणारा सुमेध आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे.

Sumedh, who blows on farmers' wounds, passes UPSC | शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

googlenewsNext

प्रकाश लामणे
यवतमाळ : हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा.. अशी म्हण आहे. हिंमत न हारता अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशश्री पायाची दासी होतेच, याचा प्रत्यय पुसदच्या सुमेध जाधव या विद्यार्थ्याने आणून दिला. एका छोट्याशा खेड्यात जन्म घेवून पुसदच्या मराठी शाळेत शिकून मुंबईत डाॅक्टर झाल्यावरही आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जखमी पायांवर उपचार करणारा सुमेध आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे. यूपीएससी परीक्षेत त्याने देशभरातून ६८७ वी रँक पटकावल्याचा निरोप येताच मंगळवारी पुसद शहरात आनंदाचे वातावरण पसरले.


डाॅ. सुमेध मिलिंद जाधव असे या यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात पुसदच्या सुमेधने बाजी मारली आहे. तो येथील समता नगरमधील रहिवासी आहे. मात्र त्याचे जन्मगाव हे तालुक्यातील बोरी मुखरे आहे. सुमेधच्या यशाने पुसदच्या समतानगरासह बोरी मुखरे गावातही आनंदाचे फटाके फुटले. त्याच्या यशाने पुसद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याचे वडील गौळ बु. येथील जेएसपीएम विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. तर आई पौर्णिमा खडकदरी येथील सु. ना. विद्यालयात शिक्षिका आहेत. सुमेधचे प्राथमिक शिक्षण पुसद येथील माईसाहेब मुखरे प्राथमिक मराठी शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण को. दौ. विद्यालयात झाले. दहावीत त्याने ९६.३६ टक्के गुण घेतले. तर उच्च माध्यमिक शिक्षण येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले. बारावीमध्ये सुमेधला ८६ टक्के गुण मिळाले होते.

लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असलेल्या सुमेधने नीट परीक्षेतही १७ वा क्रमांक पटकाविला. त्यानंतर मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज, जे. जे. शासकीय रुग्णालयात त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण घेतानाच समाजसेवेचीही आवड त्याने जोपासली. काही दिवसांपूर्वी नाशिक ते मुंबई असा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा निघाला, तेव्हा शेतकऱ्यांच्या जखमी पायांवरही सुमेधने उपचार केले. डॉ. बाबसाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनमध्ये तो हिरीरीने काम करतोय. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्कवर तो वैद्यकीय सेवा देत असतो. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट्स असोसिशनचा तो कल्चरल सेक्रेटरी आहे. सतत अभ्यासात मग्न राहताना तो लोकसेवेतही स्वत:ला व्यस्त ठेवत आला. त्यामुळे सुमेधच्या यशाने पुसदच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. सुमेधने आपल्या यशाचे श्रेय आई पौर्णिमा, वडील मिलिंद, बहीण डाॅ. प्रज्ञा यांच्यासह शिक्षकांना दिले आहे.


 सातत्याने आठ ते दहा तास अभ्यास करूनही यूपीएससी परीक्षेने पहिल्या प्रयत्नात हुलकावणी दिली होती. मात्र हार न मानता अभ्यास सुरू ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविलेच. याचा आनंद आहे. 
- डॉ. सुमेध जाधव, पुसद


आमचा सुमेध लहानपणापासूनच जिद्दी आहे. खूप अभ्यासू आहे. मुलाने अथक परिश्रम घेत यूपीएससी परीक्षेत यशाचे शिखर गाठल्याने धन्यता वाटते.
- मिलिंद जाधव, वडील


माझा मुलगा कलेक्टर व्हावा, ही इच्छा होती. ही इच्छा त्याने पूर्ण केल्याने खूप आनंद व अभिमान वाटतो.
- पौर्णिमा जाधव, आई

Web Title: Sumedh, who blows on farmers' wounds, passes UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.