सारांश बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:46 AM2021-09-26T04:46:01+5:302021-09-26T04:46:01+5:30
मारेगाव : मुंबईच्या डोंबिवली परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या त्या २९ नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात ...
मारेगाव : मुंबईच्या डोंबिवली परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या त्या २९ नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी भाजप तालुका महिला आघाडीच्यावतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना शोभा नक्षणे, शारदा पांडे, शालिनी दारूंडे, भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, विश्वजीत गारघाटे, मधु टोंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेळीपालन मार्गदर्शन व प्रशिक्षण
मारेगांव : ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, समाज प्रगती सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळका येथे शेळीपालनाबाबत मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. माजी पशुधन विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम गोखले व हिवराळे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक श्रीकांत लोडम, सुनील हिवराळे, अर्शनिलम शेख, प्रदीप पवार यांनी परिश्रम घेतले.
घरकुल लाभासाठीचे निकष शिथिल करा
मारेगाव : शासनाने घरकुलाची प्रपत्र ड यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. २०११चे सर्वेक्षणानुसार यादी आहे. मागील १० वर्षात त्या यादीतील जे मयत आहे, त्यांच्या वारसांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकुल मिळण्यासाठी शासनाने अनेक जाचक अटी ठेवल्या आहेत. फ्रीज, मोटरसायकल, शेती, उत्पन्न, नोकरी, अशा अनेक अटी ठेवल्या. त्यामुळे यादीला चाळणी लावण्याचे कठीण आणि वादग्रस्त काम ग्रामपंचायत ग्रामसभेस दिले आहे. त्यातून वाद निर्माण होत आहे. शासनाच्या विविध विभागाकडे असलेल्या माहितीच्या आधारे घरकुल लाभार्थ्याची निवड व्हावी. जेणेकरून गावात घरकुलसाठी वाद होणार नाही, अशी मागणी होत आहे.
निलजई चेकपोस्टवर कर्मचाऱ्यास मारहाण
वणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निलजई चेकपोस्टवर चौघांनी तेथील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. प्रवीण बोरकर हा या चेकपोस्टवर ड्युटी बजावत असताना एका टाटा सुमो वाहनातून चौघे जण तेथे आले. त्यांनी तुम्ही रस्त्यावर खड्डे करून बॅरिकेट्स लावून गाड्या का अडवता, असे म्हणून वाद घातला व प्रवीण बोरकर याला काठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सुरक्षा प्रभारी गणेश आत्माराम राजूरकर यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध भादंवि ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रायपूर येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
पांढरकवडा : झरी तालुक्यातील रायपूर येथील एका ५५ वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री ९ वाजता तिचा मृत्यू झाला. गंगूबाई मारोती तिरणकर (५५) असे मृत महिलेचे नाव असून पांढरकवडा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.