सोनदाबी आरोग्य केंद्राची झाडाझडती
By Admin | Published: April 2, 2017 12:29 AM2017-04-02T00:29:03+5:302017-04-02T00:29:03+5:30
सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच प्रशासनाची झोप उडाली.
प्रशासन हादरले : सभापती, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट
उमरखेड : सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणताच प्रशासनाची झोप उडाली. शनिवारी तत्काळ लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या आरोग्य केंद्राला भेट देऊन एकंदर कारभाराबाबत चांगलीच झाडाझडती घेतली.
‘सोनदाबी प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे’ या मथळ्याखाली शनिवारच्या अंकात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची तत्काळ दखल घेत सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनदाबी व येरडी आरोग्य केंद्रांमध्ये जावून पाहणी केली. त्यामुळे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पैनगंगा अभयारण्यातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोनदाबी आरोग्य केंद्रात आठ कोटी रुपये खर्चून बांधकाम झाले. परंतु हे केंद्र अजून सुरू झाले नाही. त्या ठिकाणी पाहिजे तशा सुविधा नागरिकांना मिळत नाही. यासंदर्भात पंचायत समितीचे सदस्य धनराज तगरे यांनी गटविकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच प्रशासन हादरले. सभापती प्रवीण मिरासे, उपसभापती विशाखा जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आशीष पवार, सहायक गटविकास अधिकारी सचिन खुडे, पंचायत समिती सदस्य धनराज तगरे यांनी सोनदाबी केंद्राला भेट दिली.
यावेळी सर्वच कर्मचारी हजर होते. यापूर्वी शुक्रवारी धनराज तगरे हे काही रुग्णांना घेवून आले असता त्यावेळी मात्र रुग्णालयात कोणीही नव्हते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे सभापती मिरासे यांनी सोनदाबी व परिसरातील नागरिकांची बैठक घेतली. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तक्रारी केल्या.
(शहर प्रतिनिधी)