संडे ठरला ‘बॅन डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:00 AM2021-04-12T05:00:00+5:302021-04-12T05:00:01+5:30

जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या यवतमाळ शहरातील रविवार म्हणजे जिल्हाभरातील गर्दी खेचणारा दिवस असतो. किरकोळ खरेदीदारांसोबतच जिल्ह्यातील व्यापारीही ठोक खरेदीसाठी यवतमाळात येत असतात. मात्र कोरोनाने ही परिस्थिती पालटून टाकली आहे. रविवारी यवतमाळच्या मुख्य बाजारात कुणालाही एंट्री नव्हती. दुकानेच बंद होती, त्यामुळे कोणी फिरकलेही नाही. शनिवारप्रमाणेच रविवारही नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन करीत घराबाहेर पडणे टाळले.

Sunday is 'Ban Day' | संडे ठरला ‘बॅन डे’

संडे ठरला ‘बॅन डे’

Next
ठळक मुद्देलाॅकडाऊनला दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकांचे सुख चैन हिसकावणाऱ्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक दी चेन’ मोहीम राज्य शासनाने आरंभली आहे. त्यातच शनिवारपासून सुरू झालेल्या संचारबंदीला रविवारी सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी समरसून प्रतिसाद दिला. त्यामुळे इतरवेळी खरेदीचा, मुशाफिरीचा असलेला संडे यावेळी मात्र ‘बॅन डे’ किंवा बंद वार ठरला. 
जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या यवतमाळ शहरातील रविवार म्हणजे जिल्हाभरातील गर्दी खेचणारा दिवस असतो. किरकोळ खरेदीदारांसोबतच जिल्ह्यातील व्यापारीही ठोक खरेदीसाठी यवतमाळात येत असतात. मात्र कोरोनाने ही परिस्थिती पालटून टाकली आहे. रविवारी यवतमाळच्या मुख्य बाजारात कुणालाही एंट्री नव्हती. दुकानेच बंद होती, त्यामुळे कोणी फिरकलेही नाही. शनिवारप्रमाणेच रविवारही नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन करीत घराबाहेर पडणे टाळले. एलआयसी चौक, आर्णी रोड, लोहारा चौक, बसस्थानिक चौक, दत्त चौक, दारव्हा मार्ग, पांढरकवडा मार्ग, कळंब चौक, बाजार समिती चौक ही नेहमीची भरगच्च गर्दीची ठिकाणे रविवारी शांत होती. मात्र संचारबंदीतही अत्यावश्यक सेवांना जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. त्यामुळे बहुतांश बाजारपेठ बंद असली, तरी अत्यावश्यक कामांच्या निमित्ताने बाहेर आलेल्या नागरिकांची रस्त्यावर तुरळक ये-जा होती. परंतु, इतरवेळी मुक्त फिरण्याचा आणि हवे ते खरेदी करण्याचा दिवस असलेला रविवार यावेळी संचारबंदीमुळे सुनासुना ठरला.

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही ७३ हजार ५०० दंड वसूल
संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली. यवतमाळातील बसस्थानक चाैकात रविवारी सकाळीच ही मोहीम सुरू होती. जिल्हाभरातही ३५७ केसेस करत ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

अत्यावश्यक दुकाने उघडली
संचारबंदीत कुणालाच परवानगी नाही, या संभ्रमातून शनिवारी अत्यावश्यक सेवेचीही अनेक दुकाने बंद ठेवली गेली होती. त्यात अनेक किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते यांचा समावेश होता. मात्र याबाबत रविवारी स्पष्टता झाल्याने अनेक भागांतील किराणा दुकाने उघडली गेली. भाजीपाला व फळविक्रेत्यांनीही धंदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र संचारबंदी असल्याने ग्राहकच फारसे फिरकले नाही. त्यामुळे दिवसभर केवळ दार उघडून बसावे लागले, अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली.
 

गुढीपाडव्यासाठी दुकानांची रंगरंगोटी
गुढीपाडव्याचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या मुहूर्तावर अनेक जण खरेदी करीत असतात, तर व्यापारीही नवीन माल भरतात. परंतु, यंदा गुढीपाडव्यावरही लाॅकडाऊनचे सावट आहे. असे असले तरी व्यापाऱ्यांनी गुढीपाडव्यासाठी तयारी सुरू केली आहे. शनिवार आणि रविवारच्या लाॅकडाऊनचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात रंगरंगोटी आटोपून घेतली. तर काहींनी फर्निचरची सुबक मांडणी करून घेतल्याचेही दिसून आले. रविवार दुकाने बंद असली तरी अनेक दुकानदार आपल्याच दुकानाच्या बंद दारापुढे एकमेकांशी विचारविनिमय करण्यात गढून गेल्याचेही पाहायला मिळाले.
 

गल्लीतल्या दुकानांची चांदी
मुख्य बाजारपेठेत रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मोठ मोठी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. मात्र शहराच्या अंतर्गत भागातील, गल्लीबोळातील छोटी दुकाने सुरू होती. प्रभागांमधील छोट्या किराणा दुकानांमध्ये किराण्यासोबतच स्टेशनरी व इतरही अनेक वस्तू ठेवल्या जातात. त्याचा लाभ रविवारी परिसरातील नागरिकांनी घेतला. मात्र, सोशल डिस्टन्सचे भान राखताना नागरिक दिसून आले. 

 

Web Title: Sunday is 'Ban Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.