रविवार ठरला वर्षभरातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:14 PM2019-05-26T22:14:13+5:302019-05-26T22:14:38+5:30
जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हीटचा तडाखा बसत आहे. पारा सतत ४४ अंशाच्यावर राहात आहे. उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे आजचा रविवार या वर्षातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस ठरला. रविवारी पारा चक्क ४४.८ अंशावर पोहोचला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हीटचा तडाखा बसत आहे. पारा सतत ४४ अंशाच्यावर राहात आहे. उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे आजचा रविवार या वर्षातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस ठरला. रविवारी पारा चक्क ४४.८ अंशावर पोहोचला होता.
दरवर्षीच मे महिन्यात पारा भडकतो. उष्णतेत वाढ होते. मात्र यावर्षी तापमान चांगलेच वाढले आहे. पारा सतत ४४ अंशाच्यावर आहे. त्यामुळे नागरिक कासावीस झाले आहे. पाणीटंचाई वाढत आहे. उन्हाच्या झळा सारख्या वाढत आहे. उन्हाची तीव्रता दररोज प्रखर होत आहे. रविवारी यवतमाळचे तापमान थेट ४४.८ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते, असे हवामान विभागाचे भाऊ निंबर्ते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आजचा रविवार वर्षभरातील सर्वाधिक हॉट दिवस ठरला. उन्हाच्या तीव्र लाटेचा प्रकोप आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
आतापर्यंत जिल्ह्याचे तापमान ४४.५ पर्यंत पोहोचले होते. मात्र रविवारी उन्हाने कहर केला. त्यामुळे तापमान थेट ४४.८ अंशापर्यंत पोहोचल्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याचे दिसून येते. उन्हाच्या लाटेने कृषी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. उन्हाळी भूईमुग, तिळ आणि मूग पिकासह ज्वारीला मोठा फटका बसला आहे. अति उष्णतेने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. उन्ह सहन न झाल्याने भुईमुगाचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेंगाची लागवड कमी झाल्याने उत्पादनाला फटका बसला. तिळ वेळेपूर्वीच परिपक्व झाला. ज्वारीही बारकावली आहे. मूग वेळेपूर्वीच पिवळा पडला आहे.
उष्माघाताची शक्यता वाढली
जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने उष्माघाताची शक्यता वाढली आहे. शनिवारीच घाटंजी एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. उष्माघाताचा हा धोका सर्वत्र वाढला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयात स्वतंत्र उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वत:हूनच काळजी घेण्याची गरज आहे.