भर उन्हातही मशागतीला आला वेग
By admin | Published: May 26, 2017 01:19 AM2017-05-26T01:19:13+5:302017-05-26T01:19:13+5:30
तालुक्यात भर उन्हात चटके सहन करत बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेगाने लागला आहे.
मान्सूनचे संकेत : बहुतांश शेतकऱ्यांचा कल यांत्रिक मशागतीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात भर उन्हात चटके सहन करत बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेगाने लागला आहे. यंदा मान्सून वेळेपूर्वीच येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून वेगाने मशागतीच्या कामाला लागले आहे.
वर्ष कसेही निघो बळीराजाकडे शेतीची मशागत करणे, बीज रोवणे, त्याचे संगोपन करणे ही कामे नित्याने करावी लागतात. हे पेरणी चक्रात शेतकरी पुरता घुटमळून जातो. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून हातात आलेल्या पिकावर समाधान मानत असतो. ऊन, वारा, पाऊस, हिवाळ्याची थंडी शेताच्या बांधावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यात शेतकरी धन्यता मानतो. चंद्राच्या उजेडात रात्रीची जागरण करून वन्यप्राण्यापासून तावडीतून पिकाची जोपासणा करावी लागते. रात्रपाळीतही पिकांना पाणी देणे ही कामे शेतकरी करीत राहतो.
सध्या खरिपातील कपाशीची झाडे काढणे सुरू असून सधन शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीनेही मशागत करीत आहेत. या पऱ्हाट्या शेतकरी व शेतमजूर सरपणासाठी गोळा करतात. बैलजोडीच्या वाढत्या किमतीमुळे अनेक शेतकऱ्याजवळ बैलजोडी राहिलेली नाही. शिवाय मजुरांकडून कामे करण्यास वेळही लागतो व कामेही लवकर होत नसल्याने रान मोकळे करण्यासाठी व मशागतीची कामे त्वरित उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच ही कामे मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
चालू वर्षाच्या मालाच्या भावावर ठरते पुढील नियोजन, शेतकरी पुढील हंगामाचे नियोजन सध्या मिळत असलेल्या शेतमालाच्या दरावर ठरवत असतो. गतवर्षी तुरीला आठ हजार रुपये भाव मिळाल्याने खरीपात तुरीचा पेरा वाढला होता. यंदा मात्र तुरीला साडेतीन ते साडेचार हजार पर्यंत आहे. तर शासकीय खरेदीत अनेक अडचणीचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. असे असले तरी सध्या रखरखत्या उन्हात शेतकरी आपले शेत मोकळे करून पेरणीयोग्य बनवण्यात गुंतला आहे. दुष्काळाचे दृष्टचक्र भेदून पुन्हा नव्या जोमाने व गतवर्षीसारखा चांगला पाऊस होवू दे या आशेने शेतकरी शेतकरी मशागतीस जुंपला असल्याचे दिसत आहे. सर्व शेतकऱ्यांना आस लागली आहेत ती समाधानकारक पावसाची.