राज्यातील ४६० शिवशाही बसेसचा पुरवठा मुंबई, कर्नाटकातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:13 AM2017-11-23T10:13:59+5:302017-11-23T10:14:55+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात पहिल्यांदाच वातानुकूलित शिवशाही बसेस दाखल होत आहेत. अशा ४६० बसेसच्या चेसीसचा पुरवठा टाटा मोटर्सकडून तर बॉडीचा पुरवठा मुंबई व कर्नाटकातील बेळगावच्या कंपन्यांकडून केला जात आहे.
एसटी महामंडळातील जुन्या हजारो भंगार बसेस टप्प्याटप्प्याने निर्लेखित केल्या जाणार आहेत. त्यांची जागा नव्या दोन हजार शिवशाही बसेस घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात ४६० शिवशाही बसेस एसटी महामंडळात येणार आहेत. त्याचे बजेट सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांचे आहे. आतापर्यंत १०७ बसेस आल्या आहेत. या शिवशाही बसेस टाटा बनावटीच्या (एलपीओ-१६१८) आहे. ४६० पैकी ५२ बसेस या बीएस-३ तर ४०८ बसेस बीएस-४ मानकाच्या आहेत. या ४६० बसेसचे चेसीस टाटा मोटर्सकडून खरेदी केले जाणार आहे. मे.अल्मा मोटर्स प्रा.लि. बेळगाव व मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि. मुंबई या दोन कंपन्यांना प्रत्येकी २३० शिवशाही बसेसच्या बॉडी बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच वातानुकूलित यंत्रणा बसवून घेतली जात आहे. या ४६० बसेसच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी मुंबई व बेळगावच्या पुरवठादारांकडे राहणार आहे. प्रतिष्ठित सेवा देणाऱ्या या बसेससाठी एसटी महामंडळातीलच एक्सपर्ट चालकांची वेगळी फौज तयार केली जात आहे. त्या सर्व चालकांना टाटा मोटर्सकडून प्रशिक्षित केले जाणार आहे. एसटीच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाकडे या शिवशाही बसेसच्या स्वच्छता व सेवेवर कायम नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हवेच्या दाबावर दरवाजाची उघडझाप
वातानुकूलित शिवशाही बसमध्ये प्रवासी दरवाजाची हवेच्या दाबावर उघडझाप होणार आहे. याशिवाय समोर आणि मागे एलईडी डिजीटल डेस्टीनेशन बोर्ड, प्रवाशांना सूचना देण्यासाठी पीए सिस्टीम, संकटकाळी बाहेर निघण्याच्या दरवाजाबाबत सूचना, चालकासाठी मागील बाजूचे दिसावे म्हणावे म्हणून रिव्हर्स कॅमेरा व मॉनिटर आदी सुविधा राहणार आहे.