प्रतिबंधित गुटख्याचा अकोल्यातून पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:04+5:30
तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात्र’ ठरवित प्रतिबंधित गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. प्रतिबंधित गुटख्याचे केंद्र सध्या अकोल्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने प्रतिबंध घातला असलेल्या गुटख्याचे पश्चिम विदर्भाचे मुख्य केंद्र अकोल्यात स्थिरावले आहे. तेथील शिवणगावात कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याचा साठा विविध गोदामांमध्ये करण्यात आला आहे.
तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात्र’ ठरवित प्रतिबंधित गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. प्रतिबंधित गुटख्याचे केंद्र सध्या अकोल्यात आहे. तेथून पोलीस परिक्षेत्राच्या यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला या पाच जिल्ह्यातील सूत्रे हलविली जातात. इंदोरवरून गुटख्याचा तयार माल अकोल्यातील शिवणी येथे आणला जातो. तेथे भाड्याने विविध गोदामे घेण्यात आली आहे. या गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भातील ‘गुटखा किंग’
‘विमल’ नावाने या प्रतिबंधित गुटख्याचा ब्रॅन्ड सर्वत्र पोहोचविला जातो. ‘दिलीप’ हा या गुटख्याचा पश्चिम विदर्भातील किंग मानला जातो. त्याच्यावतीने ‘श्याम’ हा या सर्व गुटख्याचा कारभार पाहतो. बुलडाणा, खामगाव, अमरावती, मूर्तीजापूर, अकोला, वाशिम, कारंजा, यवतमाळ, आर्णी, घाटंजी अशा विविध ठिकाणी या गुटख्याची गोदामे असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणावरील गुटखा तस्कर, पुरवठादार व विक्रेत्यांची वेगळी ‘साखळी’ निर्माण झाली आहे. यवतमाळात ‘फिरोज’ हा या साखळीतील प्रमुख घटक आहे. त्याच्या माध्यमातून अकोल्यातील गुटख्याच्या या ब्रँडचा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पुरवठा केला जातो.
इंदोर ते शिवणी थेट ‘कनेक्शन’
कुठे पोलीस व अन्न औषधी प्रशासनाला हाताशी धरुन तर कुठे त्यांची नजर चुकवून अकोला जिल्ह्यातील शिवणीतून गुटखा पोहोचविणारी वाहने निघतात. कधी दिवसात तर कधी रात्रीच्या वेळी संधी साधून हा गुटखा पश्चिम विदर्भात सर्वत्र पोहोचविला जातो. त्यातील मासिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. इंदोर ते शिवणी हे गुटख्याचे प्रमुख कनेक्शन आहे. शिवणीवरून हा गुटखा कोणत्ळाही शासकीय अडथळ्याशिवाय सर्वत्र पोहोचतो.
आर्थिक उलाढालीत अनेक ‘वाटेकरी’
गुटखा तस्करीतील कोट्यवधींच्या या उलाढालीत अनेक ‘वाटेकरी’ असल्याचे सांगितले जाते. आम्हाला कारवाईचे अधिकार नाही असे म्हणून पोलीस हात वर करतात. तर आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, असे सांगून कारवाईचे अधिकार असलेले अन्न व औषधी प्रशासन वेळ मारुन नेतात. त्याचाच फायदा घेऊन गुटखा तस्करांनी पाचही जिल्ह्यात आपले साम्राज्य उभे केले आहे.
एफडीए, पोलीस महानिरीक्षकांपुढे आव्हान
अकोल्यातून पाचही जिल्ह्यात गुटख्याचे नेटवर्क भक्कमपणे उभे करण्यात आले असून त्याचे आव्हान अन्न औषधी प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांपुढे आहे. अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयापुढेही या अकोल्याच्या गुटखा तस्कराने खुले आव्हान उभे केले आहे.
दिलीप व श्याम तस्करीचे मुख्य सूत्रधार
दिलीप व श्याम हे या गुटखा तस्करीचे प्रमुख सूत्रधार आहेत. यापूर्वी अकोला जिल्हा पोलिसांच्या ते रेकॉर्डवरही आले आहेत. मात्र न्यायालयातून जामीन मिळवून ते बाहेर राहिले. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनीही फारसी धडपड केल्याचे ऐकिवात नाही. अप्रत्यक्ष त्यांना अटकपूर्व जामिनासाठी पुरेशी संधी दिली गेली. पोलिसांच्या या पाठबळामुळेच दिलीप व श्याम यांची हिंमत वाढली आहे. यातूनच त्यांनी आपले ‘विमल’ गुटखा तस्करीचे नेटवर्क पाचही जिल्ह्यात सर्वदूर वाढविले आहे.