भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची पाठराखण
By admin | Published: September 19, 2015 02:27 AM2015-09-19T02:27:24+5:302015-09-19T02:27:24+5:30
पंचायत समितीतील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण केली जात आहे. तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज समितीकडे या संबंधाची तक्रार महाराष्ट्र माहिती ...
किनवट : पंचायत समितीतील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण केली जात आहे. तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज समितीकडे या संबंधाची तक्रार महाराष्ट्र माहिती अधिकार तपास समितीने केली. त्यावेळी उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
किनवट तालुक्यातील वझरा बु. ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनांमध्ये गैरप्रकार होत आहे. याची दखल घेऊन भ्रष्ट ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, अभियंता व अन्य संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या बाबत जनतेची ओरड असतानाही कारवाई केली जात नाही, असे महाराष्ट्र माहिती अधिकार तपास समितीचे तालुकाध्यक्ष अमोल शेंद्रे यांनी म्हटले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेंद्रे यांनी पंचायतराज समितीकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने यांनी कारवाईचे आश्वासन दिले. वझरा ही ग्रामपंचायत १० वर्षापासून अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे. येथील माजी सरपंच जयमाला मेश्राम यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन उपसरपंच, ग्रामसेवक, अभियंता, विस्तार अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून गैरप्रकार केला. स्वजलधारा पाणीपुरवठा, ठक्करबाप्पा, दलित वस्ती, शिवकालिन बंधारा, तेरावा वित्त आयोग, विशेष घटक योजना अशा अनेक योजनांमध्ये अपहार करण्यात आला व कामे कागदोपत्री दाखविण्यात आली. आदिवासी लोकांच्या विकासाला यामुळे खीळ बसली आहे. सुमारे ११०० लोकसंख्या असलेल्या गावातील भ्रष्ट पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दोन वर्ष का लागावी, अशी शंका तक्रारीत उपस्थित करण्यात आली आहे. पंचायतराज समितीतील आमदार नजरधने यांनी तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा शेंद्रे यांनी व्यक्त केली.