दारूबंदी समर्थक व विरोधक आक्रमक

By admin | Published: May 26, 2016 12:09 AM2016-05-26T00:09:25+5:302016-05-26T00:09:25+5:30

जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे.

Supporter and opponent aggressor | दारूबंदी समर्थक व विरोधक आक्रमक

दारूबंदी समर्थक व विरोधक आक्रमक

Next

आक्रोश मोर्चा : आमदारांच्या घराला घालणार घेराव, दुसरीकडे अनेक महिलांचाच दारूबंदीला विरोध
वणी : जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दारूबंदी समर्थक आणि विरोधक आक्रमकपणे एकमेकांविरूद्ध दंड थोपटून मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी गेले वर्षभर विविध संघटना आंदोलन करीत आहे. कधी मोर्चा, कधी घेराव, तर कधी अनोखे आंदोलन करून ते दारूबंदीची मागणी लावून धरत आहे. त्याच अनुषंगाने येत्या २६ मे रोजी दुपारी १२ वाजता श्रीगुरूदेव सेनेतर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर महिलांचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. जिल्हा दारूमुक्त करण्याची घोषणा करावी, या मागणीला घेऊन गेले वर्षभर जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावरही महिलांनी मोर्चा काढून जिल्हा दारूबंदीची मागणी केली. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी मोर्चाला भेट देऊन जिल्हा दारूमुक्त करण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनाचे काय झाले व दारूबंदीकरिता शासन स्तरावर काय कार्यवाही चालू आहे, या संदर्भात आमदार बोदकुरवार यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे.
जिल्हा दारूबंदीची शासनाने घोषणा करावी, अशी प्रमुख मागणी आहे. सोबतच चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमेवरील काही दारू दुकाने व बीअरबारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, महिलांनी मतदान करून देशी दारूचे दुकान बंद केल्यास ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला स्थगिती द्यावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानदारांकडून बेकायदेशीररीत्या स्वामिनींच्या नावे निधी गोळा केला असून त्याची सीबीआय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून निष्कासित करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या आक्रोश मोर्चाला खुद्द काही महिलांनीच विरोध दर्शवून मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात त्यांनी दारूबंदीचा निषेध व्यक्त केला. वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन त्याचे परिणाम विपरीत झाल्याचा दावा त्यांनी केला. तेथील प्रत्येक हॉटेल, पानठेला व प्रत्येक मोहल्ल्यात घरोघरी दारू विक्री सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
या दोनही जिल्ह्यात अवैध आणि बनावटी दारूचा महापूर वाहात आहे. त्याची जाणीव सर्व राजकीय व्यक्ती व सरकारलाही आहे. या दोन्ही जिल्ह्यात ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावरून दारू आणली जाते, याचीही जाणीव सरकारला आहे, असा टोलाही या महिलांनी लगावला आहे.
शासनाने चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात अधिकृत दारू परवाने बंद केले. मात्र सध्या त्यापेक्षाही १०० पटीने अधिक दारू विक्री त्या जिल्ह्यात होत असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यास शौकिनांना दारू मिळणार नाही, याची हमी शासन किंवा कुणीही देऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास लगतच्या वाशिम, अमरावती, नागपूर जिल्ह्यातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून दारू येण्याची शक्यताही या महिलांनी वर्तविली आहे. जिल्हा दारूबंदीऐवजी केंद्र व राज्य शासनाने प्रथम दारू उत्पादन करणारे कारखाने बंद करावे. जिल्हाच नव्हे, तर देश व राज्यातच दारूबंदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Supporter and opponent aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.