ईदच्या खर्चात ‘सहेरी’ला सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:02+5:30
विशेषत: मुस्लीम समाजात असे कुटुंब मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. या बांधवांच्या अत्यंत पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या महिन्यात मुस्लीम बांधवा ‘रोजा’ ठेवत आहे. हा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. परंतु हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांजवळ दोन वेळचे पोट भरायलाही पैसे नाही. त्यात गोड पदार्थ कोठून आणणार, असा प्रश्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : रमजान महिन्यातील ‘सहेरी’ अर्थात उपवास सोडण्यासाठी ७00 गरजू मुस्लीम कुटुंबांना ३0 दिवस फळे, भाजीपाला पुरविण्याचा विडा येथील काही युवकांनी उचलला. ईदसाठी खर्च करण्याऐवजी त्यातून वाचणाऱ्या पैशातून ही मदत केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागु आहे. १७ मे पर्यंत त्यात वाढ झाली. सर्व कामकाज बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. विशेषत: मुस्लीम समाजात असे कुटुंब मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. या बांधवांच्या अत्यंत पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या महिन्यात मुस्लीम बांधवा ‘रोजा’ ठेवत आहे. हा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. परंतु हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांजवळ दोन वेळचे पोट भरायलाही पैसे नाही. त्यात गोड पदार्थ कोठून आणणार, असा प्रश्न आहे.
अशावेळी गरजुंच्या मदतीला काही युवक धावून आले. रमजान महिन्यात पवित्र कार्य करावे, या उद्देशाने अशा कुटुंबांना मदत देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी यावर्षी ईद उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा, स्वत: अथवा कुटुंबासाठी नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी न करता त्यातून वाचणाºया पैशातून मदत करण्याची संकल्पना पुढे आली. सर्व युवकांनी लगेच पैसे गोळा केले आणि रमजान महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या उपक्रमाला सुरुवात केली. या निधीतून दरदिवशी ७00 कुटुंबांना फळे, भाजीपाल्याचे वाटप केले जात आहे.
या उपक्रमासाठी समीर शेख, सय्यद रेहान, इमरान खान, अनिक शेख, शाहीद शेख, अजहर मिर्जा, मुजम्मिल कुरैशी, वाजीद शेख, मौलवी फैज, मतीन सोलंकी, सय्यद अथर, मतीन शेख आदी पुढाकार घेत आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्वधर्म समभाव
हा उपक्रम केवळ मुस्लीमच नव्हे, तर सर्व समाजातील गरीब, गरजू बांधवांसाठी राबविला जात आहे. फळे, भाजीपाला घेतल्यानंतर स्वच्छ करून पिशवीत पॅक केला जातो. दुपारी १.३0 ते ४ या वेळेत गरजुंपर्यंत पोहोचविला जातो. या युवकांनी गरजुंना मदत करण्यासोबतच या उपक्रमातून सर्वधर्म समभावाचा संदेशसुद्धा दिला आहे.