यवतमाळातील दोन युवकांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय एसपीला सर्वोच्च न्यायालयाची अवमानना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 02:37 PM2019-05-06T14:37:00+5:302019-05-06T14:37:19+5:30
शैलेश ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकारी तथा एसपींना अवमानता नोटीस जारी केली आहे.
यवतमाळ : यवतमाळात २००३मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेल्या दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणात घाटंजी येथील शैलेश ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपास अधिकारी तथा एसपींना अवमानता नोटीस जारी केली आहे.
याचिकाकर्ते शैलेश ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१७ मध्ये दोन युवकांच्या मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. परंतु सीबीआयने खुनाचा गुन्हा न नोंदविता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.
गेल्या वर्षभरात या प्रकरणात नेमकी काय प्रगती झाली, याची माहिती सीबीआयकडून याचिकाकर्त्याला दिली गेली नाही. म्हणून ठाकूर यांनी सीबीआयच्या तपास अधिका-याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. याची दखल घेऊन न्या. उदय ललित, न्या. संजय कौल यांनी ३ मे २०१९ रोजी सीबीआयचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी नंदकुमार नायर यांना अवमानना नोटीस बजावली आहे. प्रकरणाच्या संपूर्ण कागदपत्रांसह व्यक्तिश: हजर राहून प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणातील संबंधित तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचा-यांवर याचिकेप्रमाणे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा नोंदविला जावा, अशी शैलेश ठाकूर यांची मागणी आहे.
२००३ मध्ये धामणगाव रोडवरील एका दरोडाप्रकरणी अजय मोहिते व सुरेश सोनकुसरे या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या ताब्यात असतानाच या संशयास्पदरीत्या युवकांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचे सांगत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका ठाकूर यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली होती. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आले. सकृतदर्शनी दोष दिसत असल्याने खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते.