‘मेडिकल’मध्ये शस्त्रक्रियांना झाली सुरुवात; थांबलेली उपचार सेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 05:00 AM2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:17+5:30
कोविड काळात अपघातग्रस्त आणि ज्यांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे, अशाच निवडक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येतील, अशा रुग्णांना वारंवार परत पाठविण्यात आले. आताही वाॅर्ड उपलब्ध नाहीत, असे कारण पुढे करून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या जात आहेत. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या जवळपास नाहीच. केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, तर नऊ रुग्ण साधा उपचार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड हाॅस्पिटल साकारण्यात आले होते. सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या इमारतीसह आयसोलेशन वाॅर्ड, रेस्पिरेटिव्ह मेडिसीन विभागाचे वाॅर्ड कोविडसाठी ताब्यात घेतले. त्यानंतरही खाटांची कमतरता भासत असल्याने सर्जरी, ऑर्थोपेडिक, ऑप्थॅम, ईएनटी या विभागांचेही वाॅर्ड अधिग्रहित करण्यात आले. तेथे कोरोनासाठी उपचार सुविधा ठेवण्यात आली. त्यामुळे वर्षभरापासून अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी थांबावे लागले. आता त्यांच्या शस्त्रक्रिया व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.
कोविड काळात अपघातग्रस्त आणि ज्यांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज आहे, अशाच निवडक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यांच्या शस्त्रक्रिया टाळता येतील, अशा रुग्णांना वारंवार परत पाठविण्यात आले. आताही वाॅर्ड उपलब्ध नाहीत, असे कारण पुढे करून शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या जात आहेत. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या जवळपास नाहीच. केवळ एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, तर नऊ रुग्ण साधा उपचार घेत आहेत. त्यामुळे ६५० च्या वर खाटा रिकाम्या पडल्या आहेत. आता त्यांचा वापर पूर्वीप्रमाणे इतर आजारांच्या रुग्णांसाठी होणे अपेक्षित आहे.
एक वर्षापासून प्रतीक्षा आत्ता कुठे मुहूर्त मिळाला
डोळ्यात मोतिबिंदू असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले होते. त्याची तपासणीही करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या भीतीमुळे मीसुद्धा घराबाहेर पडलो नाही. परिणामी मोतिबिंदूचा त्रास वाढला असून डोळ्याची नजर कमजोर झाली आहे. आता कोरोना कमी झाला असून शस्त्रक्रिया केली जावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.
- किसन राठोड
डाॅक्टरांनी कोरोना काळात पोटदुखीच्या आजाराची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी हर्नियाचा त्रास असल्याचे निदान केले होते. तेव्हा रुग्णालयात दाखलही करून घेण्यात आले. मात्र, शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. कोरोना वाढल्याने घरी राहूनच दुखणे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता दहा महिन्यानंतर शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी धडपडत आहे.
- जितेंद्र वानखडे
शस्त्रक्रिया बरोबरच इतरही उपचार झालेत सुरू
कोरोना महामारीच्या संकटातसुद्धा मेडिकलमध्ये इतर उपचार सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने सर्वसामान्य उपचार सुविधाही सुरू केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे वर्गही सुरू झाले आहेत.
- डाॅ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
शस्त्रक्रियागृहे आहेत, वाॅर्डाचे काय?
- कोरोना महामारीच्या संकटात रुग्णसंख्या पाहून ६५० खाटा कोविडसाठी ठेवण्यात आल्या होत्या. आता सक्रिय रुग्णांची संख्या केवळ दहावर आली आहे. त्यानंतरही आरक्षित वाॅर्डातील खाटा त्या-त्या विभागाकडे देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न पडत आहे. ही समस्याही आंतरिक असून त्यावर सहज तोडगा काढता येणे शक्य आहे.
सहा पैकी पाच शस्त्रक्रियागृहे सुरू
- शल्यचिकित्सा विभागाला दोन शस्त्रक्रियागृहे असून सध्या एक टेबल सुरू आहे.
- अस्थिव्यंगोपचार विभागात दोन शस्त्रक्रियागृहे आहेत. तो पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
- ईएनटी व ऑप्थॅम या विभागात प्रत्येकी एक शस्त्रक्रियागृह आहे. तेथे आता डोळे व नाक-कान-घशाच्या शस्त्रक्रिया होत आहेत.