महागाव तालुक्यात पावणेदोन लाख नागरिकांचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:39 AM2021-04-19T04:39:02+5:302021-04-19T04:39:02+5:30
महागाव : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यात पावणेदोन लाख नागरिकांचे कोरोना सर्वेक्षण सुरू करण्यात आले ...
महागाव : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यात पावणेदोन लाख नागरिकांचे कोरोना सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
गतवर्षी मार्चमध्ये पसरलेला कोरोना विषाणू आता एक वर्षाचा झाला. त्याची वाढ धोक्याची घंटा आहे. शासनस्तरावरून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आता तालुक्यातील नागरिकांची डोअर टू डोअर कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. एका आठवड्यात पावणेदोन लाख नागरिकांची कोरोना चाचणी करावयाची असल्याची माहिती तहसीलदार नामदेव ईसलकर यांनी दिली.
आशा सेविका, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ आधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची सर्वेक्षणासाठी खास नेमणूक करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील घराघरांत ही चमू पोहोचून प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण करणार आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी हा सोपा उपाय ठरणार आहे. १२ एप्रिलपासून तालुक्यात या महाअभियानाला सुरुवात करण्यात आली. १९ एप्रिलपर्यंत संपूर्ण तालुक्यातील लोकांचे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. आरोग्य, महसूल, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासन यात सहभागी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाने जास्त डोके वर काढले. मृत्युदरसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आपली दिनचर्या सांभाळावी. स्वत: वाचा आणि कुटुंबाला वाचवा, हा ध्यास घेऊन कोरोनाशी लढावे लागेल, असेही ईसलकर यांनी सांगितले.
बॉक्स
आतापर्यंत कोरोनाने घेतले ११ बळी
तालुक्यात मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत १८ हजार ६४९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात रॅपिडमध्ये ४४७, तर आरटी-पीसीआरमध्ये ६२८ असे एकूण १०७५ लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आजमितीला तालुक्यासह शहरातील १३३ ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आहे. गतवर्षी सहा, तर यावर्षीच्या दोन महिन्यांत तब्बल पाच असे एकूण ११ मृत्यू झाले. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहावे, आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी केले.