फुलसावंगीतील २७ लाखांच्या चोरीत बाबर टोळीवर संशय

By admin | Published: January 12, 2016 02:09 AM2016-01-12T02:09:53+5:302016-01-12T02:09:53+5:30

महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या ...

Suspected on Babur gang of 27 lakh crops in Phulsavangi | फुलसावंगीतील २७ लाखांच्या चोरीत बाबर टोळीवर संशय

फुलसावंगीतील २७ लाखांच्या चोरीत बाबर टोळीवर संशय

Next

तेलंगणात शोध : महागाव पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला
यवतमाळ : महागाव तालुक्याच्या फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी झालेल्या २७ लाख रुपयांच्या धाडसी चोरी मागे स्थानिक गुन्हेगार बाबर टोळीचा हात असावा असा दाट संशय पोलिसांना आहे. पोलीस बाबरच्या मागावर आहे. त्याचा लगतच्या आंध्र प्रदेश व नांदेड जिल्ह्यात ‘पार्टी’च्या ठिकाणांवर शोध घेतला जात आहे.
शुक्रवारी रात्री झालेल्या २७ लाखांच्या चोरी प्रकरणी महागाव पोलिसांनी पाच ते सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यातूनच पोलिसांना या चोरीमागे फुलसावंगी परिसरातीलच बाबर नामक क्रियाशील गुन्हेगारांचा हात असल्याची माहिती मिळाली. बाबर याने यापूर्वीही गुन्हा केला आहे. यवतमाळच्या एका दारू विक्रेत्याच्या वसुली प्रतिनिधीला महिनाभरापूर्वी लुटण्यात आले होते. या वाटमारीची तक्रार मात्र पोलिसांपर्यंत पोहोचली नाही.
बाबर हा नेहमीच अशा स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याची पोलिसांची माहिती आहे. तो चोरी केली की पसार राहतो, चोरीतील पैसा खर्च झाला की, पुन्हा गावात परततो आणि काम दाखवितो.
घटनेच्या चार-पाच दिवसपूर्वी बाबर गावात परतला होता. तो हिस्ट्रीशिटर असल्याने महागाव पोलिसांनी त्याच्यावर ‘वॉच’ ठेवणे अपेक्षित होते. मात्र त्याच्या फुलसावंगीतील ‘एन्ट्री’पासून महागाव पोलीस अनभिज्ञ राहिले. ते सतर्क असते तर मुत्तेपवार यांची २७ लाखांची रोकड कदाचित वाचली असती, असा पोलीस वर्तुळातीलच सूर आहे. बाबर गावात आल्याचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही आणि त्याने २७ लाखांचा गेम वाजविला. चोरीची ही घटना पूर्वनियोजित नव्हती. ऐनवेळी केलेला हा प्रकार होता. ४७ लाखासारखी मोठी रक्कम पाहून चोरटे अडथळा ठरणाऱ्यांचा जीवही घेतात, असा पोलिसांचा अनुभव आहे. अशा अट्टल चोरट्यांकडून रक्कम खाली सांडण्याची चूक होत नाही. म्हणूनच बाबर टोळीत बाहेरील नवखे साथीदार असावे या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत.
तब्बल २७ लाखांची रोकड असल्याने बाबर आणि त्याचे साथीदार ऐशोआरामासाठी कुठे गेले असतील असा अंदाज बांधून पोलिसांनी त्यांचा आंध्र प्रदेश व नांदेड जिल्ह्यातील कुंटणखान्यांवर शोध चालविला आहे. विशेषत: वारंगा फाट्याच्या ‘पार्टी पॉर्इंट’वर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. २७ लाखांच्या या चोरीचा महागाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत आहे. अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे हेसुद्धा या तपासावर नजर ठेऊन आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Suspected on Babur gang of 27 lakh crops in Phulsavangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.