चोरीच्या गुन्ह्यांमध्ये नव्या चेहऱ्यांवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:17+5:30
जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना घडूनही फिर्याद देणे टाळतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात चोरी, घरफोडी, वाटमारी या सारख्या मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्यांचे डिटेक्शन करताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरच पोलीस लक्ष केंद्रीत करतात. मात्र त्यानंतरही यश येत नाही. त्यामुळे चोरी-घरफोडीच्या या गुन्ह्यांमध्ये आता नवखे तरुण सक्रिय झाल्याचा व अद्याप ते रेकॉर्डवर न आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांची विविध पथके अशा नव्या चेहऱ्यांच्या मागावर आहेत.
जिल्ह्यात ‘प्रॉपर्टी ऑफेन्सेस’ची संख्या वाढत आहे. मोठ्या व गंभीर गुन्ह्यांच्याच तेवढ्या तक्रारी होतात. छुटपुट प्रकरणे तर पोलीस ठाण्यापर्यंतही येत नाहीत. ऑनलाईन एफआयआर, लिंक नसणे, त्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागणे अशा कारणांमुळे नागरिक चोरीची घटना घडूनही फिर्याद देणे टाळतात. अनेकदा गुन्ह्यांची संख्या कमी करण्याच्या छुप्या हेतुनेसुद्धा तक्रारकर्त्याला ‘लिंक नाही, लिंक फेल आहे’ अशी ठेवणीतील कारणे सांगितले जाते. पुन्हा-पुन्हा येऊनही फिर्याद दाखल होत नसल्याने अखेर नागरिक तक्रार नोंदविण्याचा नाद सोडतात. त्यातूनच गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी होते.
कुठेही चोरी-घरफोडीच्या घटना घडल्या की, पोलीस गुन्ह्याची पद्धत तपासून संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शोधतात. अनेकदा त्यांना अटक करूनही त्यांच्याकडून जप्ती होत नाही. वरिष्ठांचा ‘डिटेक्शन’चा तगादा कमी होण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना करंट गुन्ह्यात दाखविण्याचे प्रकारही घडतात. अनेक प्रकरणात गुन्ह्यांची नवी पद्धत वापरली गेल्याचे घटनास्थळ पंचनामा करताना पोलिसांना आढळून आले. काही चोºयांमध्ये चक्क चारचाकी वाहनांचा वापर झाला. ते पाहता जिल्ह्यात चोरी-घरफोडी, वाटमारींच्या घटनांमध्ये नवख्या युवकांचा शिरकाव झाला असावा, असा दाट संशय डिटेक्शन करणाऱ्या पोलिसांना आहे. त्यामुळेच त्यांनी अशा नव्या चेहºयांचा माग काढणे सुरू केले आहे. वास्तविक गुन्हेगारी वर्तुळात नव्याने सक्रिय झालेल्या टोळ्यांबाबत पोलीस ठाण्यातील खुफिया कर्मचारी, जिल्हा विशेष शाखा व राज्य गुप्तवार्ता विभागाच्या यंत्रणेकडून गोपनीय माहिती मिळणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात ही यंत्रणा या कामी फेल ठरल्याचे दिसते. चोरीत सक्रिय नवखे चेहरे अद्याप रेकॉर्डवर न आल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी महागडे मोबाईल वापरणाऱ्या, बीअरबारमध्ये वारेमाप खर्च करणाºया, मुलींना सोबत फिरविणाऱ्या, महागडे बुट, कपडे खरेदी करणाऱ्या टपोरी युवकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या वाढलेल्या गरजा हे युवक नेमके कोणत्या कमाईतून पूर्ण करतात, यावर ‘वॉच’ ठेवला जात आहे. अशा नवख्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान डीबी स्कॉड, स्थानिक गुन्हे शाखा आणि एसपींच्या विशेष पथकांपुढे आहे. गुन्हेगारी वर्तुळातील हे नवे चेहरे रेकॉर्डवर आल्यास अनेक गंभीर गुन्हे व त्यांच्या नव्या पद्धती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.
कारागृहातच शिजतो चोरी-घरफोडीचा कट
अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी अंतर्गत आरोपींची कारागृहामध्ये रवानगी होते. तेथे नवे-जुने अनेक गुन्हेगार एकत्र भेटतात. बाहेर आल्यावर नेमका कुठे हात मारायचा, कुठे भेटायचे, गुन्हा घडल्यानंतर कुठे पळून जायचे, कुणामार्फत मुद्देमाल विकायचा, हिस्सेवाटणी कशी करायची आदी बाबींचे ‘प्लॅनिंग’ कारागृहातच केले जात असल्याची पोलिसांची माहिती आहे. त्यामुळेच एखादा अट्टल गुन्हेगार कारागृहातून सुटल्यानंतर संबंधित पोलीस अनेक दिवस त्याच्या हालचालींवर नजर ठेऊन असतात. कारागृहात शिजणारे हे कट आधीच उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आता कारागृहातील अनेक बराकींमध्येही आपले ‘खबरे’ पोसले असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्याबाहेरील टोळ्यांवरही संशय
जिल्ह्यात घडलेल्या काही गुन्ह्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पुसदमधील घटनेत ही बाहेरील गँग रेकॉर्डवर आली. त्यामुळे यवतमाळ व इतरत्र घडलेल्या गुन्ह्यांमध्येही जिल्ह्याबाहेरील टोळीचा हात आहे काय? या दृष्टीने तपास केला जात आहे. अशा टोळ्यांमध्ये स्थानिक भौगोलिक स्थितीचा अभ्यास असलेले एक-दोन गुन्हेगार सहभागी राहत असल्याचेही आढळून आले आहे.