आरएफओसह पाच कर्मचारी निलंबित
By admin | Published: January 13, 2016 03:00 AM2016-01-13T03:00:43+5:302016-01-13T03:00:43+5:30
तालुक्यातील सावळीसदोबा वन विभागातील अवैध सागवान वृक्षावरील हॅमर प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह पाच वन कर्मचारी निलंबित करण्यात आले.
सावळी वन विभाग : बोगस हॅमरप्रकरण भोवले
आर्णी/सावळीसदोबा : तालुक्यातील सावळीसदोबा वन विभागातील अवैध सागवान वृक्षावरील हॅमर प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह पाच वन कर्मचारी निलंबित करण्यात आले. ही कार्यवाही उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा यांनी केली.
सावळीचे वन परिक्षेत्र अधिकारी हनवारीलाल जाधव, अंजनखेडचे वनपाल बी.पी. राऊत, सावळीचे वनपाल बालाजी चव्हाण, सावळीचे वनमजूर आर.पी. बांगर आणि जी.एफ. खडसे असे निलंबित झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव आहे. सावळी सदोबा परिसरातील माळेगाव, वरुड वन परिक्षेत्रात वन विभागाच्या फिरत्या पथकाने कारवाई केली होती.
त्यावेळी सर्वे नंबरच्या सागवानावर हॅमर मारत असताना याच सोबत अवैध कटाईतील सागवानावरसुद्धा हॅमर मारल्याचे निदर्शनास आले होते. तसेच सावळी परिसरात आॅक्टोबर महिन्यात अवैध वृक्षतोड उघडकीस आली होती. तसेच उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी ११ आॅक्टोबर रोजी धाड टाकली होती. त्यावेळी २६ नग सागवान अवैधरीत्या आढळून आले होते. या सर्व प्रकाराची चौकशी केल्यावर दोषी आढळल्याने वन परिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल आणि दोन वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
सावळीसदोबा परिसरात अवैध सागवान व्यवसाय जोरात सुरू असून लगतच्या मराठवाडा आणि आंध्रप्रदेशात कटाई केली जाते. या कारवाईने या परिसरातील अवैध वृक्षतोडीवर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)