नऊ तालुक्यांत कर्ज वसुली स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 10:32 PM2018-11-06T22:32:58+5:302018-11-06T22:33:37+5:30
दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड आणि राळेगावचा समावेश आहे. तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तीन तालुक्यांमध्ये केळापूर, मारेगाव आणि यवतमाळचा समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी या नऊ तालुक्यांमध्ये आठ उपाययोजनांची अंमलबजवणी होणार आहे.
यामध्ये कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्याच्या सूचना आहेत. यासोबतच सहकारी कर्ज वसुलीचे पुनर्गठन करण्याच्या सूचना आहेत. जमीन महसूलातही सुट देण्याच्या सूचना आहेत. कृषीपंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सुट देणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सुट, रोहयोच्या कामाच्या निकषात बदल करणे, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सचा पुरवठा करणे, दुष्काळग्रस्त भागातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.
अशा आठ उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतीला जोडधंद्यासाठी मदत हवी
दिवसेन्दिवस कृषीची अर्थव्यवस्था बिकट होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतीला जोडधंदा असण्याची गरज आहे. त्या दृष्टीने दुष्काळी भागात ठोस उपाययोजनाची गरज आहे. तरच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.
चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर
दुष्काळी तालुक्यात पुढील काही महिन्यात चाऱ्याची भीषण स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर भूजलाची पातळी सर्वत्र घटत आहे. यातून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.