वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदल्यांना स्थगिती; नागपूर ‘मॅट’चा निर्णय
By सुरेंद्र राऊत | Published: July 18, 2023 05:47 PM2023-07-18T17:47:39+5:302023-07-18T17:48:25+5:30
बदली प्रक्रियेवर ओढले ताशेरे
यवतमाळ : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेप घेत यवतमाळ मेडिकलच्या प्राध्यापकांनी नागपूर ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. प्राध्यापकांची बाजू ऐकून घेत बदली प्रक्रियेला ८ ऑगस्टपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश ‘मॅट’ने दिला. तसेच राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षक व संशोधन संचनालयाचे संचालक, संबंधित वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना लेखी जबाब सादर करण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्र प्रशासकीय लवाद नागपूर खंडपीठात वैद्यकीय प्राध्यापकांनी याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली. न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्याकडे प्राध्यापकांचे वकील ॲड. संदीप मराठे यांनी युक्तिवाद केला. ही बदली प्रक्रिया कशी चुकीची आहे, हे ‘मॅट’ च्या निदर्शनास आणून दिले. प्राध्यापकांच्या बदल्या करताना शासन आदेश ९ एप्रिल २०१८ यातील सूचना व निर्देशाचे पालन केले नसल्याचा ठपका ‘मॅट’ ने ठेवला. पुढील आदेशापर्यंत वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदल्या करू नये असे स्पष्ट केले.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय पोटे, डॉ. गौतम खाकसे, डॉ. पाशू शेख, डॉ. जय राठोड यांनी याचिका दाखल केली होती. यासह चंद्रपूर, नागपूर, अकोला येथील वैद्यकीय प्राध्यापकांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर येथील वैद्यकीय प्राध्यापकांना बदली आदेशानंतर तेथील अधिष्ठातांनी कार्यमुक्त केले होते. आता ‘मॅट’ च्या आदेशामुळे या ठिकाणचे सहयोगी प्राध्यापक पुन्हा रुजू होत आहेत.