बाबाचा शंकास्पद मृत्यू, तरी मुलगा परीक्षेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:29+5:30
शुक्रवारी त्याने मुलासोबत तलावामध्ये जाऊन मासोळ्या पकडल्या. त्यानंतर कळंब येथे मासोळी विकण्यासाठी तो अंकीतसोबत आला. दरम्यान दाढ दुखत आहे म्हणून सायंकाळी तो डॉ. देवयानी काळे यांच्या दवाखान्यात गेला. डॉ. काळे यांनी त्याच्या दाढेत इंजेक्शन लावले. इंजेक्शन लावताच चिंतामणच्या तोंडातून फेस आला आणि तेथेच तो निपचित पडला.
गजानन अक्कलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गरीब मासोळी विक्रेत्याचा रुग्णालयात अवघ्या दहा मिनिटात संशयास्पद मृत्यू झाला. सारे नातेवाईक डॉक्टरला घेरून पोलीस ठाण्यात धडकले. नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टमार्टेमसाठी मृतदेह नेला. तेथून एसपी कार्यालयावर न्यायासाठी धडक दिली. अन् या सर्व धावपळीत न्याय मागत फिरतानाही मृताचा मुलगा मात्र मनात दहावीच्या परीक्षेचा विचार कायम ठेवून होता. वडिलांचे पोस्टमार्टेम सुरू असतानाच त्याने भूमितीचा पेपरही मन लावून सोडविला. या प्रकाराने कळंबची पंचक्रोशी शनिवारी विचारमग्न झाली.
मृत इसमाचे नाव चिंतामण श्रावण शिवरकर (४५) असे असून तो तालुक्यातील मांजरवघळ येथील रहिवासी आहे. शुक्रवारी त्याने मुलासोबत तलावामध्ये जाऊन मासोळ्या पकडल्या. त्यानंतर कळंब येथे मासोळी विकण्यासाठी तो अंकीतसोबत आला. दरम्यान दाढ दुखत आहे म्हणून सायंकाळी तो डॉ. देवयानी काळे यांच्या दवाखान्यात गेला. डॉ. काळे यांनी त्याच्या दाढेत इंजेक्शन लावले. इंजेक्शन लावताच चिंतामणच्या तोंडातून फेस आला आणि तेथेच तो निपचित पडला.
या प्रकाराने घाबरून डॉ. देवयानी काळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चिंतामणला तातडीने आॅटोतून कळंब ग्रामीण रुग्णालयात परस्पर दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अगदी ठणठणीत दवाखान्यात आलेले बाबा अचानक कसे मृत झाले, या अंकीतच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तेथे कोणीही तयार नव्हते. त्यानंतर रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांनी कळंब पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
त्यामुळे कुटुंबीयांनी कळंब येथे शवविच्छेदन करण्यास विरोध करुन मृतदेह यवतमाळ येथे हलविला. तर या सर्व दु:खात, गडबडीतही अंकित हा मुलगा दहावीचा पेपर देण्यासाठी कळंबच्या परीक्षा केंद्रात गेला. भूमितीचा पेपर मन लावून सोडविला आणि तडक यवतमाळात धडकला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर सरळ मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर नेला. तेथे तक्रार व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कळंब येथे तक्रार द्या, नियमानुसार कारवाई केली जाईल, अशा शब्दात पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर मृतदेह मांजरवघळ येथे नेण्यात आला. तेथे पोलीस संरक्षणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी मृताची पत्नी रुपाली यांनी डॉ. देवयानी काळे या आपल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार दिली. दरम्यान डॉ. देवयानी काळे दवाखाना बंद करुन कुठेतरी निघून गेल्याची माहिती आहे. मृताच्या मागे पत्नी, मुलगी किरण (१८), मुलगा अंकीत (१६), निखिल (१४) असा परिवार आहे.
मृताच्या पत्नीने तक्रार दाखल केली. नियमानुसार तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
- विजय राठोड, ठाणेदार, कळंब.