सागवान भरलेला संशयास्पद ट्रक यवतमाळ जिल्ह्यातील वन विभागाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 09:49 PM2020-05-30T21:49:49+5:302020-05-30T21:50:15+5:30
सागवानाने भरलेला संशयास्पद ट्रक शनिवारी सायंकाळच्या सुमारास महागाव वन विभागाने ताब्यात घेतला. करंजखेड शिवारात ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सागवानाने भरलेला संशयास्पद ट्रक शनिवारी सायंकाळच्या सुमारास महागाव वन विभागाने ताब्यात घेतला. करंजखेड शिवारात ही घटना घडली.
करंजखेड शिवारात एका शेतातील सागवान कापण्याची परवानगी घेण्यात आली. मात्र भलतीकडेच सागवानाची तोड सुरू असल्याचा संशय येथील उपसरपंच भरोस चव्हाण यांना आला. त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यावरून शनिवारी सायंकाळच्या सुमारास वन परिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांनी करंजखेड शिवारात सागवानाने भरलेला एक ट्रक ताब्यात घेतला. मात्र दुसरा ट्रक पुसदकडे पळून जाण्यास यशस्वी ठरला. उपसरपंचाची तक्रार आल्याने खातरजमा करण्यासाठी हा ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती हेमंत उबाळे यांनी दिली. वृत्तलिहिस्तोवर कारवाई सुरू होती.