गावागावात राबविले जाणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:06 PM2024-09-11T16:06:35+5:302024-09-11T16:06:56+5:30

Yavatmal : २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधी दरम्यान राबविल्या जाणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान

'Swachhta Hi Seva' campaign to be implemented in villages | गावागावात राबविले जाणार 'स्वच्छता ही सेवा' अभियान

'Swachhta Hi Seva' campaign to be implemented in villages

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 'स्वच्छता ही सेवा' हे अभियान २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अभियानासाठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात या अभियानास लोकचळवळ बनविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.


अभियानांतर्गत १ हजार २०० ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जातील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभ १७ सप्टेंबरला गाव, तालुका व जिल्हास्तरावर होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमाच्या माध्यमातून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे. 


१९ सप्टेंबरला एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठ सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते, महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले यांची सफाई केली जाणार आहे. 


पथनाट्य, कलापथक, संगीत 
गाव व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबवून स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. स्वच्छतेच्या अनुषंगाने पथनाट्ये, कलापथक, संगीत, नृत्य प्रकार, संस्कृती दर्शन या माध्यमातून जनजागृती केल्या जाणार आहे. एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.


एक झाड आईच्या नावे अन् शाळांमध्ये स्पर्धाही

  • गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यात एक झाड आईच्या नावे हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. स्वच्छता विषयक विविध स्पर्धा, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झालेले आहे, त्या गावामधील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई, गरज असल्यास दुरुस्ती केल्या जातील. कायम अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहे. यादरम्यान वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा, शोषखड्डा यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ते कार्यान्वित करून कचरा गाड्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
  • २ ऑक्टोबरला गावागावात महिला, पुरुष आणि विद्यार्थी स्वच्छतेची शपथ घेणार आहे. याच दिवशी गावात ग्रामसभा घेऊन स्वच्छ माझे अंगण स्पर्धेमधील कुटुंबांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी कळविले आहे.

Web Title: 'Swachhta Hi Seva' campaign to be implemented in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.