अतिपावसाने शेतात दलदल

By admin | Published: August 10, 2016 01:17 AM2016-08-10T01:17:58+5:302016-08-10T01:17:58+5:30

दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

Swamp Field | अतिपावसाने शेतात दलदल

अतिपावसाने शेतात दलदल

Next

ओल्या दुष्काळाचे सावट : पूर नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी
पुसद : दररोज कोसळत असलेल्या पावसाने पुसद उपविभागातील शेतांमध्ये दलदल झाली असून आंतरमशागतीची कामे ठप्प असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. तर अतिपावसाने सोयाबीन, तूर पीक धोक्यात आले आहे. यासोबतच नदी-नाल्यावरील शेतांना पुराचा फटका बसला आहे. पुसद उपविभागावर यावर्षी ओल्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.
पुसद कृषी उपविभागात महागाव, उमरखेड, पुसद आणि दिग्रस तालुक्याचा समावेश आहे. यंदा पुसद उपविभागात वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला आहे. महागाव तालुक्याने तर वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली आहे. उपविभागात दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतकरी आता हैराण झाले आहे. या पावसामुळे चिबाड क्षेत्रासह काळ्या कसदार शेतातही दलदल झाली आहे. महिनाभरापासून दररोज कोसळणाऱ्या पावसाने शेतामध्ये पाणी साचले आहे. चिबाड क्षेत्रातील पिके तर आत्ताच पिवळी पडली असून या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. काळ्या कसदार शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाऊस उसंत देत नसल्याने आंतरमशागतीची कामे खोळंबली आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. निंदण, खुरपण आणि डवरीची कामेही ठप्प पडली आहे. परिणामी पिकांची वाढ खोळंबली आहे. महागाव तालुक्यातील अनेक शेतांमध्ये आजही तळे साचल्याचे दिसत आहे. अशीच अवस्था उमरखेड आणि दिग्रस तालुक्याचीही आहे.
नदी-नाल्याच्या तीरावरील शेतांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. काही शेतात तर नदीतील रेती आणि दगड येऊन पडले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. पुसद येथील विदर्भ शेतकरी संघटनेने आमदार मनोहरराव नाईक यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात नदी-नाल्याच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतशिवाराचे तत्काळ सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव, भवरसिंह सिसोदिया, विजय उबाळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सुरुवातीला दमदार पावसामुळे शेतकरी समाधानी होता. यावर्षी मुबलक पिकण्याची आशा होती. परंतु आता शेतकऱ्यांची ही आशा मावळली आहे. अति पावसाने पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. (प्रतिनिधी)

सततच्या पावसाने मजुरांचे हात रिते
खरीप हंगामात मजुरांना निंदण, खुरपण यासह डवरणीची मोठ्या प्रमाणात कामे मिळतात. सणासुदीच्या दिवसात याच मजुरीवर त्यांचा प्रपंच चालविला जातो. परंतु यावर्षी सततच्या पावसाने मजुरीच मिळत नाही. कोणत्याही शेतात मजुरीचे कामे नाही. सलग १५ दिवस उन्ह तापल्याशिवाय निंदण, खुरपणाची कामे होणे शक्य नाही. अनेक शेतमजुरांना नागपंचमी सारखा सण उधार-उसणवार घेऊन करावा लागला. गावागावात मजूर ठप्प बसून असल्याचे दिसत आहे. सर्वांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे.
 

Web Title: Swamp Field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.