सीआयडी धाडीनंतरही जुगार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:58 PM2018-06-02T21:58:57+5:302018-06-02T21:58:57+5:30
सीआयडीच्या अमरावती येथील पथकाने थेट महासंचालकांच्या आदेशावरून स्थानिक धामणगाव रोडचा मटका अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हाभरातील तमाम अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महासंचालकांनाही जुमानत नसल्याचे सर्वत्र कायम असलेल्या अवैध धंद्यांवरून सिद्ध होते आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सीआयडीच्या अमरावती येथील पथकाने थेट महासंचालकांच्या आदेशावरून स्थानिक धामणगाव रोडचा मटका अड्डा उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हाभरातील तमाम अवैध धंदे बंद होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा महासंचालकांनाही जुमानत नसल्याचे सर्वत्र कायम असलेल्या अवैध धंद्यांवरून सिद्ध होते आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेने राज्य सीमेवरील पाटणबोरी येथे शुक्रवारी मोठी धाड टाकून या बाबीवर शिक्कामोर्तब केले. धामणगाव रोडवर ‘मेनबाजार’ या मटका आकड्यांचे कॉल सेंटर गेल्या सात महिन्यांपासून सुरू होते. त्याबाबत महानिरीक्षकांकडे चार वेळा तक्रारीही केल्या गेल्या. मात्र कारवाई झाली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने थेट पोलीस महासंचालकांचा दरबार गाठून तक्रार नोंदविली. महासंचालकांनी अमरावती परिक्षेत्रातील कोणत्याही जिल्हा पोलीस प्रशासनावर अथवा महानिरीक्षक कार्यालयावर विश्वास न दाखविता या अड्ड्यावरील धाडीसाठी थेट अमरावती सीआयडीची मदत घेतली. सीआयडीने दोन दिवस ‘रेकी’ केल्यानंतर ही धाड यशस्वी केली. या धाडीच्या १५ मिनिटपूर्वी धुळ्यामधील शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा तेथील सीआयडीने अशाच एका मटका कॉल सेंटरवर धाड घातली. या दोन्ही धाडींचे नियंत्रण महासंचालक कार्यालयातून केले गेले, हे विशेष. ‘मेनबाजार’च्या दोन मालकांमधील भागीदारी व आर्थिक वादातून या तक्रारी महासंचालकांपर्यंत पोहोचत असून त्यातूनच या धाडी घातल्या गेल्याचे सांगितले जाते.
थेट महासंचालक कार्यालय जिल्ह्यातील मटका-जुगारावर धाडी घालण्यास सांगत आहे, हे पाहून जिल्हा पोलीस प्रशासनाची झोप उघडणे व जिल्हाभरातील तमाम मटका, जुगार, क्लब, तीन पत्ते, आडी हे सर्व अड्डे तत्काळ बंद होणे अपेक्षित होते. परंतु पोलीस अधिकाऱ्यांना महासंचालकांच्या या नियंत्रणाचीही भीती वाटली नाही की काय म्हणून आजही सर्वत्र अवैध धंदे सुरू आहे. शुक्रवारी एलसीबीने पाटणबोरीत धाड घालून धंदे सुरू असल्याचे सिद्ध केले. यापूर्वी पाटण हद्दीत धाड पडल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी पुन्हा तोच अड्डा जैसे थे सुरु झाला होता. पाटणबोरीचा अड्डाही काही दिवस बंद राहून संमतीने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
आजही आर्णीतील प्रेमनगर व एका ढाब्याच्या आडोश्याने आडी अर्थात एका-बादशाह (चेंगळ) सुरू आहे. लोणबेहळमध्येही त्याच ‘भाऊ’चा मटका सुरू आहे. उमरखेडमध्ये नाग चौक परिसरात, पुसदमध्ये नामांकित घराच्या मागील बाजूला, पोफाळी ठाण्याच्या हद्दीत, पांढरकवड्यातील आठवडी बाजार, यवतमाळ, घाटंजी, शिरपूरमधील बेलोरा, दारव्ह्यातील बोदेगाव येथे ढाब्याच्या आश्रयाने, नेर, बाभूळगाव, लाडखेड हद्दीतील बोरीअरब येथे एकाच इमारतीत वेगवेगळ्या माळ्यावर चेंगळ, मटका, तीन पत्ती राजरोसपणे सुरू आहे. घाटंजीमध्ये शहराच्या मधात चार ते पाच जण भागीदारी असून हिरवळीवर क्लब चालवित आहे. तेथे एका वेळी ४० ते ५० जणांची हजेरी राहत असल्याचे सांगितले जाते. आर्णीतील चेंगळ अड्डा अगदी बाजार समितीच्या मार्गावर आहे. शेतकरी बाजारात बियाणे घ्यायला येतो आणि या जुगार अड्ड्यावर आपले खिसे खाली करून जातो.
पाटणबोरीच्या अड्ड्यावर होती ७२ वाहने
पाटणबोरी येथे राजेश अण्णाच्या अड्ड्यावर पडलेल्या धाडीत पोलिसांनी रेकॉर्डवर आकडे बरेच कमी दाखविले आहे. तेथे ७२ वाहने, तेवढीच माणसे व ६० ते ६५ लाखांची रोकड असल्याचे सांगितले जाते. खिशात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम असल्याशिवाय या जुगार क्लबवर एन्ट्री मिळत नाही, हे विशेष. या धाडीत तेलंगणातील प्रतिष्ठीतांना सोडून देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून हा क्लब सुरू असताना नेमकी पांढरकवडा ठाणेदाराला वर्षभर मुदतवाढ मिळाल्यानंतरच धाड का असा प्रश्न पोलीस वर्तुळात चर्चिला जात आहे.
पोलीस अधिकाºयांमधील गटबाजीतून ‘टिप’
जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गटबाजी व त्यातूनच वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. याच लढाईतून टिप देणे, धाडी घालणे असे प्रकार होत असून यात पोलीस दलाची प्रतिमा मात्र मलीन होते आहे. पाटणबोरीतील धाड अशाच गटबाजी व वैमनस्यातून घातली गेल्याचे बोलले जाते. यापूर्वी पांढरकवड्यातूनसुद्धा पाटणच्या हद्दीत अशाच वादातून मोठी धाड घातली गेली होती. अधिकारी वर्ग एकमेकांचा हिशेब चुकता करण्यासाठी वरपर्यंत माहिती देऊन या धाडी घालून घेत असल्याचेही बोलले जाते.