कलेक्टरच्या परवानगीशिवाय जलतरण प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:25 PM2018-04-03T22:25:13+5:302018-04-03T22:25:13+5:30
नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलावावर अवा्या एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या हौशी जलतरण संघटेने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविनाच तीन महिन्यांचे ‘समर स्विमिंग कॅम्प’ सुरु केले. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या शिबिराला मूकसंमती दिली.
आझाद मैदानातील शासकीय जलतरण तलाव जिल्हा क्रीडा संकुल समितीतर्फे संचालित केला जातो. जिल्हाधिकारी हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सदस्य सचिव आहे. फेब्रुवारी २०१३ पासून आजतागायत जिल्हा क्रीडा संकुल समिती स्वत:च या जलतरण तलावाचे संचालन करीत आहे. दरम्यान, जलतरण तलाव खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्याकरिता पाच वेळा निविदा निघाल्या. मात्र विविध कारणाने त्या बारगळल्या. शासकीय जलतरण तलाव कोणत्याही पात्र खासगी संस्थेला चालविण्यासाठी देताना जिल्हा क्रीडा संकुल समिती एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे रितसर करारनामा करून ठरावीक कालावधीत देऊ शकते. या प्रक्रियेसाठी संबंधित खासगी संस्थेला जलतरण चालविण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव, पुरेसा प्रशिक्षण तांत्रिक कर्मचारी, जलतरण प्रशिक्षण पात्रता प्रमाणपत्र आदी बाबी संस्थेकडे असल्याची खात्री केली जाते.
हौशी जलतरण संघटना ही एक वर्षापूर्वीच नव्याने स्थापन झाली आहे. या संघटेचे पदाधिकारी शासकीय जलतरण तलावावर सक्रिय असून तेथील दैनंदिन कामकाजातही ते दखल देतात. हौशी जलतरण संघटनेच्या शासकीय जलतरण तलावावरील सक्रिय सहभागाला जिल्हा क्रीडा अधिकाºयांची सहमती असल्याचे दिसून येते. दरवर्षी उन्हाळ्यात या तलावावर प्रशिक्षणार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. उन्हाळ्यात तीन ते चार महिन्यात क्रीडा संकुल समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र यावर्षी हौशी जलतरण संघटनेने जिल्हा क्रीडा संकुल समितीची कोणतीही मान्यता न घेता शासकीय जलतरण तलावावर २ एप्रिल ते ३० जूनपर्यंतच्या ‘समर स्विमिंग कॅम्प’ची योजना आखली. तसे फ्लेक्सही शहरात चौकाचौकात लावले. या फ्लेक्सवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वा कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही, हे विशेष.
हौशी जलतरण संघटनेने शासकीय जलतरण तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी क्रीडा कार्यालयाकडे विनंती अर्ज दिला. हा अर्ज जिल्हा क्रीडा संकुल समितीसमोर ठेवला होता. जिल्हाधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा झाली. त्यांनी मुख्याधिकाºयांना प्रत्यक्ष पाहणी करण्यास सांगितले. संघटनेच्या विनंती अर्जावर लवकरच निर्णय होईल. तूर्तास प्रशिक्षण शिबिराला मान्यता नाही.
- प्रदीप शेटिये,
प्रभारी ल्हिा क्रीडा अधिकारी, यवतमाळ.
मान्यता गृहित धरून लावले शहरात फ्लेक्स
कोणतीही मान्यता नसताना सदर संघटनेने शहरात फ्लेक्स लावले. याबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे विचारणा केली असता, सदर हौशी जलतरण संघटना आम्हाला सहकार्य करीत असते, असे उत्तर देण्यात आले. या संघटनेने प्रशिक्षण शिबिराचे फ्लेक्स शहरात लावले असेल, तर त्यांनी आपल्या विनंती अर्जाला मान्यता मिळेल, हे गृहित धरूनच ते लावले असतील, अशी अफलातून शक्यताही वर्तविली.